अलिबागजवळ २०००० किलो वजनाच्या ब्ल्यू व्हेलचा मृत्यू
By Admin | Published: June 25, 2015 03:55 PM2015-06-25T15:55:36+5:302015-06-25T16:01:04+5:30
अलिबागच्या समुद्रकिना-याजवळ आलेल्या ४० फूट लांब व २०००० किलो वजनाच्या ब्ल्यू व्हेल माशाचा आज पहाटे मृत्यू झाला.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - अलिबागच्या समुद्रकिना-याजवळ आलेल्या एका अवाढव्य 'ब्ल्यू व्हेल' माशाचा अखेर मृत्यू झाला आहे. सुमारे ४० फूट लांब आणि २० हजार किलो वजनाचा हा व्हेल मासा काल दुपारी अलिबागजवळील रेवदंडा येथील समुद्रकिना-यावर आढळला होता. स्थानिक मच्छिमारांनी वनविभगाच्या अधिका-यांसह त्याला खोल समुद्रात सोडण्याचे शर्थीचे प्रयत्न केले मात्र ते अयशस्वी ठरले आणि आज पहाटे चारच्या सुमारास त्या व्हेलचा मृत्यू झाला.
काल दुपारच्या सुमारास हा मासा वाहून समुद्रकिना-यावर पोचला. ही बातमी कळताच परिसरातील नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.
रेवदंड्याचा हा किनारा उथळ असल्याने त्या व्हेलला पुरसे पाणी मिळाले नाही. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने आम्ही संध्याकाळी सहाच्या सुमारास त्याला समुद्रात ढकलण्याचे प्रयत्न सुरू केले, त्यासाठी जेसीबी मशीन्सचीही मदत घेण्यात आली. आम्ही त्याला समुद्रात सोडण्यासाठी जास्त ढकलण्याचा प्रयत्न केला असता तर तो जखमी होण्याची शक्यता होती, त्यातच बरेच दिवस पुरेसे अन्न न मिळाल्याने तो अशक्त झाला होता, अखेर आमचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि आज पहाटे चारच्या सुमारास त्या 'ब्ल्यू व्हेल'चा मृत्यू झाला, अशी माहिती वनविभागाच्या अधिका-यांनी दिली. त्या समुद्र किना-याजवळच एक खड्डा खणून त्या व्हेलला पुरण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.