आत्महत्यांच्या प्रयत्नांचे गालबोट
By admin | Published: August 16, 2015 02:49 AM2015-08-16T02:49:57+5:302015-08-16T02:49:57+5:30
शैक्षणिक सुविधांचा अभाव असल्याचा निषेध नोंदवत चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विषप्राश्न करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तर मुंबई उच्च न्यायालयाचे
कोल्हापूर, चंद्रपूर : शैक्षणिक सुविधांचा अभाव असल्याचा निषेध नोंदवत चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरमध्ये व्हावे, या प्रलंबित मागणीसाठी सहा वकिलांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील दमपूर मौदा येथील महाविद्यालयात ही घटना घडली. शिष्यवृत्ती देण्यास महाविद्यालय प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याच्या तक्रारीची दखल न घेतली गेल्यामुळे कृष्णा राठोड (१८), प्रेमदास रामदास राठोड (१८), प्रफुल्ल राठोड (१७), प्रवीण जाधव (१८) या विद्यार्थ्यांनी विषप्राशन केले.
खंडपीठासाठी अंगावर ओतले रॉकेल...
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी कोल्हापूर येथील शासकीय इमारतीजवळ वकील संघटनांचे काही सदस्य जमले होते. त्यांनी येथे खंडपीठ करण्याची मागणी जोरदारपणे लावून धरली.
त्यापेकी सहा वकिलांनी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच रोखून ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
या घटनेमुळे काही काळ वातावरण तणावाचे बनले होते. गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर येथे खंडपीठ करण्याची मागणी वकिलांच्या संघटनांनी लावून धरली आहे.
चारही विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत आहे...
महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी चारही विद्यार्थ्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.