उर्वरीत २६ टक्के नागरिकांना पहिला डोस देण्याचे लक्ष्य; आयुक्तांचे आरोग्य विभागाला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 08:19 PM2021-08-30T20:19:37+5:302021-08-30T20:21:05+5:30
कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका व त्यात डेल्टा विषाणूचा प्रसार रोखण्याचे आव्हान मुंबई महापालिकेपुढे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका व त्यात डेल्टा विषाणूचा प्रसार रोखण्याचे आव्हान मुंबई महापालिकेपुढे आहे. आतापर्यंत ७४ टक्के नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र लसींच्या उपलब्धतेनुसार सर्व मुंबईकरांना दोन्ही डोस मिळण्यासाठी नोव्हेंबर महिना उजाडणार आहे. त्यामुळे उर्वरित २६ टक्के नागरिकांना पहिला डोस देण्याचे नियोजन करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. मात्र १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ९६.७ लाख लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत २४.९ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. कोविडची तिसरी लाट सप्टेंबर महिन्यात येण्याचा धोका आरोग्यतज्ज्ञांनी वर्तविला आहे. तत्पूर्वी सर्व मुंबईकरांचे लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनाने ठेवले होते. त्यानुसार दररोज एक लाख नागरिकांना डोस देण्याचा निर्धार पालिकेने केला होता. मात्र लसींचा साठा मर्यादित असल्याने या मोहिमेचा वेग मंदावला आहे.
पहिला डोस पूर्ण करा
मुंबईत १८ वर्षांवरील ९६ लाख लाभार्थी आहेत. सर्व वयोगटातील ९१ लाख ४३ हजार ८२४ नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे. मागील दोन महिन्यांत स्तनदा माता, गर्भवती महिला, अंथरुणावर खिळलेले रुग्ण अशा सर्वांचे लसीकरण सुरू केले आहे. खाजगी लसीकरण केंद्रांच्या मदतीने दररोज दोन लाख नागरिकांना डोस देण्याची तयारी पालिकेने दाखवली आहे. मात्र लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे या मोहिमेत अधूनमधून खंड पडत आहे. त्यामुळे उर्वरित २६ टक्के नागरिकांना पहिला डोस लवकरात लवकर देण्यात येणार आहे.
असे आहे नियोजन
पालिका, सरकारी आणि खाजगी ४४५ लसीकरण केंद्रांवर कोविड प्रतिबंधक डोस दिला जात आहे. मुंबईतील सर्व २२७ वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली आहेत. येथे लसीकरण झालेल्या नागरिकांना स्थानिक नगरसेवकांच्या सहाय्याने आणले जाणार आहे. तसेच नागरिकांमध्ये लस्सी घेण्याबाबत जनजागृती केली जाईल. त्याचबरोबर स्वयंसेवी संस्था आणि खासगी रुग्णालयांचे सहकार्य पालिका घेणार आहे.
एकूण लाभार्थी १८ वर्षांवरील - ९६.७ लाख
आतापर्यंत लसीकरण झालेले - ९१. ४३ लाख
दोन्ही डोस घेतलेले - २४.१५ लाख
आतापर्यंत झालेले लसीकरण
आरोग्य सेवक/ फ्रन्टलाइन वर्कर्स - ७३३८४०
ज्येष्ठ नागरिक - १७८८८४१
४५ ते ५९ वर्षे - २६६९३६८
१८ ते ४४ वर्षे - ३९१०८४५
स्तनदा माता - ६६३०
गर्भवती महिला - ९१०
अंथरुणाला खिळलेले – ३११९