BMC Election - निवडणुकीच्या रिंगणात नाही एकही पारसी उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2017 04:10 PM2017-02-16T16:10:42+5:302017-02-16T17:26:34+5:30
पारसी समाज एकेकाळी मुंबईच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजवायचा. काळानुरुप पारशांची लोकसंख्या घटत गेली.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - पारसी समाज एकेकाळी मुंबईच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजवायचा. काळानुरुप पारशांची लोकसंख्या घटत गेली तसे या समाजाचे राजकारणातील प्रतिनिधीत्वही कमी होत गेले. यंदाच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात एकही पारसी उमेदवार नाहीय. 50 वर्षात प्रथमच एकही पारसी उमेदवार रिंगणात नाहीय.
सध्याच्या पालिकेत नोशीर मेहता एकमेवर पारसी नगरेसवक आहेत. सध्याचे पालिका सभागृह 21 फेब्रुवारीनंतर विसर्जित होईल. 72 वर्षीय नोशीर मेहता यांची नगरसेवकपदाची ही चौथी टर्म आहे. त्यांच्या कुटुंबाने मागची 50 वर्ष मुंबई सेंट्रल येथील प्रभागातून पालिकेत प्रतिनिधीत्व केले. नोशीर यांच्याआधी त्यांची बहिण अनिता दोन टर्म वडिल रुसी पाचवेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले.
मतदारसंघ फेररचनेमध्ये त्यांचा मतदारसंघ ओबीसीसाठी राखीव झाल्याने त्यांना यंदाची निवडणूक लढवता आली नाही. नोशीर यांनी बेस्ट समितीचे चेअरमनपदही भूषवले आहे. पारशी समाजाचे मोठया प्रमाणावर स्थलांतर झाल्यामुळे प्रतिनिधीत्व कमी झाले असे नोशीर सांगतात.
स्वातंत्र्यापूर्वी मुंबईच्या राजकारणात पारशी समाजाची महत्वाची भूमिका होती. पण आता एकाही प्रमुख पक्षाने पारसी समाजाला उमेदवारी दिलेली नाही. बॉम्बे पारसी पंचायतीचे माजी अध्यक्ष दिनशॉ मेहता म्हणाले कि, पारसी समाजाची लोकसंख्या घटल्यामुळे राजकीय पक्ष पारशी उमेदवारांकडे दुर्लक्ष करतात. सध्या मुंबईतील पारशी समाजाची लोकसंख्या 50 हजारच्या आसपास आहे.