BMC ELECTION RESULT : मातोश्री बाहेर शिवसैनिकांचा जल्लोष
By admin | Published: February 24, 2017 12:08 AM2017-02-24T00:08:29+5:302017-02-24T00:08:29+5:30
आवाज कुणाचा...कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा यासह विविध घोषणांनी ‘मातोश्री’बाहेरील परिसर सेना कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - आवाज कुणाचा...कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा यासह विविध घोषणांनी ‘मातोश्री’बाहेरील परिसर सेना कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला. मतमोजणी सुरु होताच आणि काही निकाल हाती येताच शिवसैनिकांसह पदाधिकाºयांनी मातोश्रीबाहेर एकच गर्दी करण्यास सुरुवात केली. रात्रीपर्यंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एकच वर्दळ होती.
गेल्या पालिका निवडणुकीवेळी शिवसेनेला ७५ जागांवर समाधान मानावे लागले होते. यंदा युती नसल्याने पूर्ण ताकदीनीशी उतरत शिवसेनेकडून प्रचारावर चांगलाच भर देण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुंबईत १९ प्रचारसभा घेतल्या आणि प्रचारात मुसंडीही मारली. शिवसेना विरुध्द भाजप असेच चित्र मुंबईत होते आणि सेनेसाठी ही तर प्रतिष्ठेची लढाई होती. त्यामुळे बहुमताचा आकडा नक्की गाठू असा विश्वास सेनेला होता. गुरुवारी सकाळी १0 वाजता मुंबईत ठिकठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आणि मतमोजणी केंद्रांबाहेर सेना कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. दोन तासांत काही विजयाचे निकाल येताच वांद्रे पूर्व येथील ‘मातोश्री’बाहेर एकच गर्दी जमण्यास सुरुवात झाली. संध्याकाळपर्यंत बहुतेक निकाल आल्यानंतर कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. भगवे झेंडे, ढोलताशे, नगारे घेऊन वाजत-गाजत कार्यकर्ते मातोश्री बाहेर जमू लागले आणि ढोल-ताशांच्या तालावर कार्यकर्ते ताल धरत होते. यामध्ये महिला कार्यकर्त्यांचीही संख्या मोठी होती. आवाज कुणाचा यासह अनेक घोषणा सेना कार्यकर्त्यांकडून देण्यात येत होत्या. काही जणांकडून तर मिठाइचेही वाटप केले जात होते. विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी फटाक्यांची आतीषबाजीही करण्यात आली. विजयी उमेदवारांचा तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकाºयांचा राबता हा रात्री उशिरापर्यंत सुरुच होता.
दरम्यान, दादरसह वरळी, लालबाग, परळ आणि भायखळा हे पारंपरिक गडांमध्ये शिवसेना उमेदवारांनी एकहाती विज मिळवल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनकडेही धाव घेतली. ढोल-ताशांच्या गजरातच गुलालाची उधळण करत शिवसेना भवनचा परिसर भगवा झाला होता. दुपारी उशिरापर्यंत शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वाट पाहत होते. यावेळी शिवसेना आमदार निलम गो-हे आणि सुनिल शिंदे यांनीही शिवसैनिकांसह जल्लोषात भाग घेतला.