BMC ELECTION RESULTS : सेनाभवनाबाहेर शिवसैनिकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2017 12:08 PM2017-02-23T12:08:05+5:302017-02-23T12:08:05+5:30
शिवसेना भवनाबाहेर भगवे झेंडे घेऊन शिवसैनिकांच्या गर्दीला सुरुवात झाली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - मुंबई महापालिका निवडणुकांच्या मतमोजणीचे कल हाती येऊ लागले आहेत, तसतशी निकालाची उत्सुकता सर्वसामान्यांप्रमाणे राजकीय पक्षांमध्येही वाढू लागली आहे.
विशेष म्हणजे दादर हा गड शिवसेना पुन्हा मिळवणार असे चित्र निर्माण झाले आहे. आश्चर्यकारकरित्या, दादरमध्ये शिवसेना सहापैकी पाच जागांवर आघाडीवर आहे.
2012च्या निवडणुकीत दादरमध्ये मनसेने शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले होते. शिवसेनेसाठी हा प्रभाग प्रतिष्ठेचा मानला जातो. त्यामुळे हा बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी शिवसेनेने सगळी ताकद पणाला लावली होती.
दादर-माहिम विधानसभेत महापालिकेचे सहा प्रभाग येतात. मराठी बहुल लोकवस्तीचा परिसर म्हणूनच या भागाकडे पाहिले जाते. वॉर्ड 191 हा त्यातील सर्वात महत्वाचा वॉर्ड समजला जातो आहे. त्यामुळे या प्रभागातील निकालांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 2012 च्या पालिका निवडणुकीत मनसेने मुसंडी मारीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले होते.
मात्र, मनसेकडे गेलेले प्रभाग कोणत्याही परिस्थितीत परत मिळवायचे, अशी व्यूहरचना शिवसेनेकडून आखण्यात आली होती. मतमोजणीचे कल पाहता शिवसेनेला याचा फायदा झाल्याचे पाहायला मिळतं आहे. मात्र स्पष्ट हे संपूर्ण निकाल हाती आल्यानंतरच समजू शकणार आहे.
शिवसेनेचा प्रतिष्ठेचा वॉर्ड क्रमांक 191
शिवसेना आणि मनसेने प्रतिष्ठेच्या केलेल्या दादरच्या 191 वॉर्डमध्ये भाजपाच्या तेजस्विनी जाधव आघाडीवर आहेत. मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत आणि मनसेच्या स्वप्ना देशपांडे पिछाडीवर पडल्या आहेत. स्वप्ना मनसेचे विद्यमान नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या पत्नी आहेत.
2008 पर्यंत हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला होता. पण 2009 विधानसभा निवडणुकीत मनसेचे नितीन सरदेसाई इथून आमदार झाले आणि त्यानंतर चित्रच बदलून गेले.