बीएमसी म्हणजे शिवसेनेचे दुकान - नारायण राणे
By admin | Published: April 17, 2015 04:15 PM2015-04-17T16:15:16+5:302015-04-17T19:54:30+5:30
मुंबई महानगरपालिका हे शिवसेनेचं दुकान असून कामधंदा न करता मनपाच्या टक्केवारीवर जगणारी अनेक कुटुंब शिवसेनेत असल्याचा आरोप नारायण राणेंनी केला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई. दि. 17 - मुंबई महानगरपालिका हे शिवसेनेचं दुकान असून कामधंदा न करता मनपाच्या टक्केवारीवर जगणारी अनेक कुटुंब शिवसेनेत असल्याचा आरोप नारायण राणेंनी केला आहे. वांद्रे पूर्व येथील निवडणुकीतील पराभवानंतर एका मुलाखतीत त्यांनी सेनेवर टीकास्त्र सोडले. गेल्या 22 वर्षांपासून मुंबईत सेनेची सत्ता आहे, मात्र तरीही नागरिकांसाठी पुरेशा सुविधा नाहीत. मुंबई मनपाएवढा भ्रष्टाचार संपूर्ण देशात कुठेही होत नाही. सेना मुंबई, ठाणे मनपाच्या जीवावर जगते, असे ते म्हणाले. आगामी महापालिका निवडणुकीत आपण काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एमआयएमला मॅनेज करण्यासाठी राणेंनी पाच कोटींची ऑफर दिली होती, या रामदास कदमांच्या आरोपलाही त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. रामदास कदम हा अतिशय बेजबाबदार माणूस असून पालकमंत्री बनण्याचीही त्यांची लायकी नसल्याचे राणेंनी म्हटले. शिवसेना आता वाघ राहिलेली नाही तर मांजर झाली आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. तसेच शिवसेनेत आता कोणीही निष्ठावान सैनिक उरले नसल्याचे सांगत बाळासाहेब गेल्यानंतर सर्वांचीच निष्ठा संपली आहे, आता उरलेत ते कमर्शिअल शिवसैनिक असा आरोपही राणेंनी केला. तसेच मी एकवेळ राजकारण सोडेन पण पुन्हा शिवसेनेत जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
वांद्रयातील पराभवानंतर राणेंची राजकीय कारकिर्द संपली अशी टीका करणा-या सेना नेत्यांनाही त्यांनी खडे बोल सुनावले. मी जेव्हा सेनेत होतो, तेव्हा या नेत्यांची माझ्या आजूबाजूला उभा रहायचीही हिंमत नव्हती, ज्यांचे स्वत:चे काही कर्तृत्व नाही, त्यांची माझ्या भविष्याबद्दल बोलण्याची लायकी नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.