‘बीएमएम २०२४’ सान होजेमध्ये : अमेरिकेत मराठी बांधव विचारणार, ‘काय बे?’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 06:31 AM2023-09-14T06:31:40+5:302023-09-14T06:32:40+5:30
'BMM 2024' : आयटीपासून स्टार्टअप्सपर्यंत विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने मान आणि धन दोन्ही बक्कळ कमावलेल्या मराठी माणसांचे अमेरिकेतील ‘पुणे’ म्हणजे सॅनफ्रान्सिस्कोच्या कुशीतला श्रीमंत, उद्योगी ‘बे एरिया’! जून २०२४ मध्ये बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या मराठी अधिवेशनाचा मांडव सजणार आहे.
पुणे : आयटीपासून स्टार्टअप्सपर्यंत विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने मान आणि धन दोन्ही बक्कळ कमावलेल्या मराठी माणसांचे अमेरिकेतील ‘पुणे’ म्हणजे सॅनफ्रान्सिस्कोच्या कुशीतला श्रीमंत, उद्योगी ‘बे एरिया’! जून २०२४ मध्ये बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या मराठी अधिवेशनाचा मांडव सजणार आहे. लक्ष्मी आणि सरस्वतीच्या आशीर्वादाने गेल्या ५० वर्षांपासून जगाच्या जगण्या-वागण्याची दिशा बदलण्यात अग्रभागी असलेल्या या प्रांतात भारताबाहेरील सर्वांत मोठे मराठी संमेलन थाटात भरणार आहे. त्यात किमान ७ हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती संमेलनाचे प्रमुख निमंत्रक आणि अमेरिकेतील ख्यातनाम मराठी उद्योजक प्रकाश भालेराव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
बृहन्महाराष्ट्र मंडळ ही उत्तर अमेरिकेतील सर्व मराठी मंडळांची मातृसंस्था दर दोन वर्षांनी मराठी संमेलन आयोजित करते. २७ ते ३० जून २०२४ दरम्यान सान होजे कन्व्हेन्शन सेंटर परिसरात बीएमएम संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. ‘काय बे?’ असे मिश्कील घोषवाक्य माहिती-तंत्रज्ञानाच्या या जन्म-कर्मभूमीत मराठी माणसाने स्वकर्तृत्वाने कमावलेले अढळ स्थान अधोरेखित करणारे आहे.
‘काय बे’ संमेलनाबाबत...
- सिलिकॉन व्हॅलीत तब्बल चार दिवस मराठी कला, संस्कृती, परंपरा व खाद्यसंस्कृतीचा उत्सव
- बिझिनेस कॉन्फरन्समध्ये जगभरातील आघाडीचे मराठी उद्योजक एकत्र
- चित्रपट महोत्सवासह व्याख्याने, चर्चासत्रे, मुलाखती
- अमेरिकन मराठी विवाहेच्छुक मुला-मुलींसाठी ‘रेशीमगाठी’
- २० आयोजक समित्या, ३२० स्वयंसेवकांचे काम सुरू
अमेरिकेत स्थायिक असलेल्या सर्व मराठी माणसांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्यासाठी एका विशेष ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. त्या आधारे विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जातील.
- प्रकाश भालेराव, निमंत्रक, बीएमएम २०२४