परीक्षा मंडळाचे संचालक नेटके यांचा राजीनामा
By admin | Published: May 20, 2017 01:11 AM2017-05-20T01:11:29+5:302017-05-20T01:11:29+5:30
साई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराची जबाबदारी मराठवाड्यातील प्रत्येक नागरीकाची आहे; माझी नव्हे, असे सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : साई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराची जबाबदारी मराठवाड्यातील प्रत्येक नागरीकाची आहे; माझी नव्हे, असे सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी ही जबाबदारी पत्रकार परिषदेत झुगारून लावली. या प्रकरणात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.
विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या साई इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील विद्यार्थी हे शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरी उत्तरपत्रिका सोडवत असताना गुन्हे शाखेने छापा टाकून पकडले. या घटनेच्या तिसऱ्या दिवशी विद्यापीठात दाखल झालेले कुलगुरू डॉ. चोपडे यांनी या प्रकरणात अनेक निर्णय घेतले. ज्या प्रकरणाने विद्यापीठाची देशभरात बदनामी झाली त्याचे प्रमुख म्हणून आपण या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारणार का असा थेट प्रश्न ‘लोकमत’ प्रतिनिधीने विचारताच कुलगुरू गांगरले. आणि ‘माझी कशी असेल? ही जबाबदारी मराठवाड्यातील नागरिकांची, विद्यार्थी, संस्थाचलकांची आणि तुमची सुद्धा आहे’ असे म्हणत त्यांनी जबाबदारी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. मग साई इंजिनिअरिंगमध्ये घडलेल्या प्रकाराला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला असता, त्यास परीक्षा विभागच जबाबदार ठरतो, असे त्यांनी मान्य केले.