‘महानंद’चे संचालक मंडळ बरखास्त होणार
By admin | Published: September 5, 2015 01:52 AM2015-09-05T01:52:10+5:302015-09-05T01:52:10+5:30
गैरव्यवहारांच्या आरोपामुळे वादात सापडलेले राज्य सहकारी दूध उत्पादक संघ (महानंद) संचालक मंडळ येत्या दोन-तीन दिवसांत बरखास्त करण्यात येईल
मुंबई/जळगाव : गैरव्यवहारांच्या आरोपामुळे वादात सापडलेले राज्य सहकारी दूध उत्पादक संघ (महानंद) संचालक मंडळ येत्या दोन-तीन दिवसांत बरखास्त करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे महसूल व दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, खडसे यांच्या घोषणेपूर्वीच महानंदच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी दिलेला राजीनामा संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
‘महानंद’च्या संचालक मंडळावर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप होते. या आरोपांची सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात आली आहे. त्यात तथ्य असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमला जाणार खडसे यांनी सांगितले. दूध संघांनी महानंदला दूध न देणे, महानंदच्या पैशाने विदेश दौरे करणे व त्याचा हिशेब सादर न करणे, खरेदी व्यवहारातील गैरप्रकार, दूध भुकटी प्रकल्पाचा पांढरा हत्ती अशा विविध प्रकरणांकरिता लेखापरीक्षण अहवालात ठपका ठेवण्यात आला असल्याचे समजते.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
.................
नागवडे यांचा राजीनामा
महानंदच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी गोरेगाव येथे झाली. अध्यक्षा नागवडे यांनी अलीकडेच आपला राजीनामा सादर केला होता. हा विषय संचालक मंडळाच्या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर होता. त्यांचा राजीनामा मंजूर करून अध्यक्षांचे अधिकार नव्या व्यक्तीची निवड होईपर्यंत महानंदचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय झाला.
........................................
........................................
.........................
मार्केटिंग फेडरेशनही ‘रडार’वर
महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या कामकाजातही गोंधळ आहे. या संदर्भात आपणाकडे तक्रारी असून त्यावरही बरखास्तीची कारवाई केली जाणार असून प्रशासकीय मंडळ स्थापन केले जाईल, असेही खडसे यांनी सांगितले.