रद्दीच्या पैशांसाठी बोर्डाच्या उत्तरपत्रिकांची चोरी!

By admin | Published: April 16, 2017 03:05 AM2017-04-16T03:05:08+5:302017-04-16T03:05:08+5:30

दहावीच्या तीन विषयांच्या उत्तरपत्रिका चोरीप्रकरणी दहिसर पोलिसांनी शनिवारी दोघांना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

Board papers for junk money stolen! | रद्दीच्या पैशांसाठी बोर्डाच्या उत्तरपत्रिकांची चोरी!

रद्दीच्या पैशांसाठी बोर्डाच्या उत्तरपत्रिकांची चोरी!

Next

मुंबई : दहावीच्या तीन विषयांच्या उत्तरपत्रिका चोरीप्रकरणी दहिसर पोलिसांनी शनिवारी दोघांना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. विक्रम हरीश शर्मा (वय २०) आणि अकिक रब्बानी शेख (२०) अशी अटक आरोपींची नावे असून रद्दी विकून पैसे मिळविण्यासाठी पेपर चोरुन जंगलात लपविले होते, अशी कबुली त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
अकीक शर्मा हा बोरिवलीत एका खासगी कंपनीत काम करतो. तर शेख हा वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्गात शिकत आहे. ३ एप्रिलला दोघांनी दहिसरच्या इस्रा विद्यालय हायस्कूलमधून शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र पाठक (५६) यांच्या कक्षातून इतिहास व विज्ञान विषयाच्या प्रत्येकी १५० तर संस्कृत विषयाच्या २१६ अशा ५१६ न तपासलेल्या उत्तरपत्रिका चोरल्या होत्या. त्या न सापकल्याने पाठक यांनी ७ एप्रिलला दहिसर पोलीस ठाण्यात दहावीच्या परीक्षेतील तीन विषयांच्या उत्तर पत्रिका शाळेतून चोरीला गेल्याची तक्रार दिली.
पोलिसांनी या प्रकरणाचा शिताफीने तपास करीत दोघांना अटक करत त्यांच्याकडुन संस्कृत आणि इतिहास या विषयांच्या एकूण ३६६ उत्तरपत्रिका जप्त केल्या. रद्दी विकून पैसे कमविण्याच्या उद्देशाने चोरलेले पेपर हे बोर्डाच्या उत्तरपत्रिका असल्याचे समजल्यानंतर त्यांनी घाबरुन पुन्हा त्या त्याच दिवशी शाळेत नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्याध्यापक पाठक हे केबिनमध्ये असल्याने त्यांनी त्या पुन्हा नेल्या. (प्रतिनिधी)

‘ते’ अठ्ठेचाळीस तास आणि गर्दुल्ला!
उत्तरपत्रिका चोरी प्रकरणाचा तपास करणाऱ्या सहाय्यक निरीक्षक पवार आणि त्यांच्या पथकाने शाळेच्या सर्व शिक्षक तसेच विश्वस्तांची चौकशी केली. त्यांचे सीडीआर काढत आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, त्यात काही हाती लागले नाही. त्यामुळे शाळा परिसरातील झोपडपट्टीत जाऊन ह्यडोअर टू डोअरह्ण चौकशी सुरू केली.सतत ४८ तास तपास मोहीम राबवित परिसर पिंजून काढला. त्यानंतर एका गर्दुल्याकडून थोडी माहिती मिळाल्यानंतर त्याच्या आधारावर दोघा अल्पवयीन मुलांसह चौघांना ताब्यात घेतले.

उत्तरपत्रिकांचा ‘प्रवास‘
शर्मा आणि शेख यांनी तीन एप्रिलला तीन विषयांचे गठ्ठे चोरले. शाळेचे नाव असलेल्या पिशव्यांमध्ये ते भरले आणि झोपडपट्टीजवळील मैदानात ठेवले. त्यानंतर चार एप्रिलला तिन्ही पिशव्या त्यांनी बोरिवली नॅशनल पार्कच्या जंगलात लपवून ठेवल्या. अटकेनंतर त्यांनी पोलिसांना ती जागा दाखवल्याने पोलिसांनी तेथून संस्कृत आणि इतिहासाच्या उत्तरपत्रिकांच्या पिशव्या ताब्यात घेतल्या. विज्ञानाच्या उत्तरपत्रिकांच्या शोधासाठी जंगलात ‘कोम्बिंग आॅपरेशन’ करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Board papers for junk money stolen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.