पुरवणी परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्याची मंडळाची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 03:46 AM2020-08-15T03:46:44+5:302020-08-15T03:46:52+5:30
कोरोनाची स्थिती आणि या सूचना विचारात घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पुणे : राज्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा तसेच एमएचटी-सीईटी बाबत गोंधळाची स्थिती असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण
मंडळाने इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेची चाचपणी सुरू केली आहे. ही परीक्षा आॅक्टोबरमध्ये घेण्याची तयारी सुरू केली असून याबाबतच्या सूचना सर्व विभागीय मंडळांकडून मागविण्यात आल्या आहेत. कोरोनाची स्थिती आणि या सूचना विचारात घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
लेखी, प्रात्यक्षिक तसेच तोंडी परीक्षा आॅक्टोबर महिन्यात घेण्याचे नियोजन आहे. हे वेळापत्रक सर्व विभागीय मंडळांना पाठविण्यात आले आहे. त्यावर सूचना व दुरूस्त्या मागविण्यात आल्या आहेत. दरवर्षी जुलैमध्ये या परीक्षा होतात. पण यंदा कोरोनामुळे निकाल विलंबाने लागल्याने पुरवणी परीक्षा होणार की नाही, याबाबतचा प्रश्न होता. पण राज्य मंडळाकडून संभाव्य वेळापत्रक तयार केल्याने आता या परीक्षेची चर्चा सुरू झाली आहे. दरवर्षी संभाव्य तारखा निश्चित करून विभागीय मंडळांकडून सुचना मागविल्या जातात. यावर्षीही त्याच प्रक्रियेनुसार कामकाज सुरू आहे.