बोर्डाच्या तपासनिसांचे मानधन अवघे पाच रूपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2017 04:10 AM2017-01-06T04:10:44+5:302017-01-06T04:20:11+5:30
वर्षानुवर्षे दहावी-बारावीच्या विद्यार्थी संख्येत वाढ होत आहे.मात्र, या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात गेली दहा वर्षे एक रुपयाचीहीवाढ झालेली नाही
प्राची सोनवणे, नवी मुंबई
वर्षानुवर्षे दहावी-बारावीच्या विद्यार्थी संख्येत वाढ होत आहे.मात्र, या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात गेली दहा वर्षे एक रुपयाचीहीवाढ झालेली नाही. शिक्षकांवरील ताण दिवसेंदिवस वाढत असला, तरी एक उत्तरपत्रिका तपासण्यासाठी दहावी बोर्डाच्या तपासनिसाला अवघे सव्वा चार रुपये, तर बारावीच्या तपासनिसाला ५ रुपये मानधन दिले जाते.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेचे पेपर तपासण्याचे जबाबदारीचे काम शिक्षकांवर सोपविले जाते. बोर्डाच्या परीक्षेसाठी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याकरिता शासनाकडून भरमसाठ पैसा खर्च केला जातो.
दहा दिवसांत बोर्डाचे पेपर तपासण्याचा नियम करण्यात आला असून, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम करण्यासाठी आग्रह धरणारे शासन तपासनिसांच्या समस्यांकडे कानाडोळा करत असल्याचे निदर्शनास येते. फेब्रुवारी-मार्च २०१७ रोजी होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेला दहावीच्या जवळपास ३ लाख ८४ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज सादर केले आहेत, तर बारावीच्या परीक्षेकरिता ३ लाख ३० हजार,७०८ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहे.
मागील वर्षी झालेल्या दहावीच्या परीक्षेकरिता सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासण्याकरिता एकूण १५ हजार,९६६ तपासनीस आणि २६९९ मॉडरेटर होते, तर बारावी बोर्डाच्या परीक्षेला सर्व विषयांचे मिळून ७ हजार ६९३ तपासनीस आणि १५८१ मॉडरेटर होते.