बोटी बुडाल्या पण मच्छीमारांनी साडेचार किमी पोहून गाठला किनारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2016 09:58 AM2016-08-22T09:58:48+5:302016-08-22T12:27:36+5:30
उत्तरेला 70 नॉटिकल मैल अंतरावर उंबरगावजवळ या बोटी बुडाल्या असून बोटींमधील 15 मच्छिमारांना वाचवण्यात यश मिळालं आहे
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - मुंबईच्या समुद्रात उत्तरेला 70 नॉटिकल मैल अंतरावर बुडालेल्या दोन मच्छीमारी नौकांमधील १५ मच्छीमार सुखरुप आहेत. उंबरगावजवळ रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मच्छीमारीसाठी गेलेल्या दोन्ही नौका बुडाल्या. या बोटीतील १५ मच्छीमारांनी पोहून किनारा गाठल्याने बचावले. हिमसागर आणि कृष्ण सागर अशी या बोटींची नावे आहेत.
पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव या गावातील हे मच्छीमार होते. तराफाच्या मदतीने खवळलेल्या समुद्रातून हे पंधरा जण साडे चार किलोमीटर अंतर पोहून उंबरगाव येथील वृदावन परिसरातील किना-यावर पहाटे सुमारे साडे तीन वाजता पोहोचले.
काल झाई बोरीगाव येथील एक बोट मच्छिमारीसाठी समूद्रात गेली असता ती मध्ये बंद पडली. त्यानंतर सदर बोटीला मदत करण्यासाठी त्याच गावातील दूसरी बोट तिथे गेली असता खवळलेल्या समूद्राचा अंदाज न आल्याने दोन्ही बोटी एकमेकावर आदळून दोन्ही बोटीत पाणी शिरले. त्यामुळे बोटीतील मच्छीमार समुद्रात फेकले गेले.
त्यानंतर सदर बोटीतील मच्छिमारांशी काहीही संपर्क होत नसल्याने , या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. हॅलिकॉप्टर, तटरक्षक दल आणि नौदलाच्या दोन जहाजांच्या मदतीने शोध सुरु झाला. पण त्यांना हे मच्छीमार सापडले नाहीत. दरम्यान पहाटे सदर मच्छिमार सूस्थितीत किना-यावर सापडले.