नौका विभागप्रमुखाला डावलले
By Admin | Published: July 29, 2016 12:48 AM2016-07-29T00:48:35+5:302016-07-29T00:48:35+5:30
सागरी विभागातील अधिकाऱ्यांसाठी पोलिसांच्या नौका विभागाचे विशेष सुरक्षा प्रशिक्षण गोव्यात आयोजित करण्यात आले असताना त्या विभागाच्या पोलीस अधीक्षकांना डावलून
- जमीर काझी, मुंबई
सागरी विभागातील अधिकाऱ्यांसाठी पोलिसांच्या नौका विभागाचे विशेष सुरक्षा प्रशिक्षण गोव्यात आयोजित करण्यात आले असताना त्या विभागाच्या पोलीस अधीक्षकांना डावलून अन्य अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. मोटार ट्रान्सपोर्टच्या (एमटी) पुणे मुख्यालयातील विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील यांनी केलेल्या या नियुक्तीबाबत पूर्ण विभागात चर्चा आहे.
गोव्यात गुरुवारपासून तीन दिवसांचे विशेष तांत्रिक प्रशिक्षण शिबिर सुरू झाले आहे. यामध्ये अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसह दहा जणांना अद्ययावत माहिती दिली जाणार आहे. मात्र त्यासाठी एम.टी.च्या नौका विभागातील अधीक्षक निशिकांत मोरे यांनाच कळविण्यात आलेले नाही. त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेले पुण्यातील अधीक्षक प्रकाश आचरेकर यांना पाठविण्यात आले आहे.
पोलीस दलातील अधिकारी व बंदोबस्तासाठी विविध प्रकारची वाहने, वाहक पुरविणे आणि त्या वाहनांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी मोटार परिवहन (एम.टी.) विभागावर आहे. २६/११ नंतर या विभागातही मोठ्या प्रमाणात वाहने व सामग्री घेण्यात आली आहे. सागरी किनाऱ्यावर गस्तीसाठी पाठविल्या जाणाऱ्या अद्ययावत बोटी व वाहनांची जबाबदारी हाताळण्यासाठी एम.टी.मध्ये कोकण परिक्षेत्रासाठी स्वतंत्र नौका विभाग कार्यरत आहे. या विभागातील अधिकारी व अंमलदारांना दरवर्षी सागरी सुरक्षेबाबत अद्यावत प्रशिक्षण दिले जाते. कर्तव्य बजावताना सुरक्षेच्या दृष्टीने घ्यायची काळजी, शत्रूंना प्रतिबंध करणे आदीबाबत त्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाते. मात्र या प्रशिक्षण शिबिराकडे वरिष्ठ अधिकारी व प्रशासन किती सहजतेने पाहतात आणि त्यामध्ये वैयक्तिक लागेबांधे जपतात, हे एम.टी.च्या पोलीस नौका ‘रिफ्रेशर टेक्निकल ट्रेनिंग’च्या निमित्ताने समोर आले आहे.
मे. गोवा शिपयार्ड कंपनीच्या वतीने २८ ते ३० जुलै दरम्यान हे सागरी घटकांतील अधिकाऱ्यांसाठी रिफ्रेशर टेक्निकल ट्रेनिंग’ होत आहे. नौका विभागाचे प्रमुख आणि गेल्या साडेतीन वर्षांपासून अधीक्षकपदाचा कार्यभार सांभाळत असलेल्या निशिकांत मोरे यांची त्यासाठी नियुक्ती होणे आवश्यक असताना त्यांना डावलण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी पुण्यातील अधीक्षक आचरेकर यांच्यासह एकूण दहा अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
एम.टी. विभागाचे प्रमुख व विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील यांनी २० जुलैला प्रशिक्षणासाठी त्यांच्या नियुक्तीचा आदेश काढला आहे. नौका विभागाला पूर्णपणे अंधारात ठेवून सागरी सुरक्षेसाठीच्या प्रशिक्षणासाठी अन्य कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्याच्या त्यांच्या या कृतीबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे.
नौका विभागाच्या प्रशिक्षणासाठी आचरेकर यांनी इच्छा प्रदर्शित केल्याने त्यांना पाठविण्यात आले आहे. नौका विभागाचे अधीक्षक मोरे यांनी आपल्याला कळविले असते तर त्यांना पाठविले असते.
- फत्तेसिंह पाटील (विशेष पोलीस
महानिरीक्षक, एम.टी. पुणे)
आपल्याला पूर्णपणे आंधारात ठेवून अधिकाऱ्यांची परस्पर निवड करण्यात आली आहे. नौका विभागासाठी ट्रेनिंग असताना त्यामध्ये कोणाच्या इच्छेवरून पाठविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यावरून वरिष्ठांना सागरी सुरक्षेचे गांभीर्य किती आहे, हे स्पष्ट होते.
- निशिकांत मोरे (अधीक्षक, नौका विभाग,
कोकण परिक्षेत्र, एमटी)