तेलंगणात कामासाठी गेलेला बोबन बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2017 02:04 AM2017-02-19T02:04:43+5:302017-02-19T02:04:43+5:30
सुधागड तालुक्यातील मुळशी कातकरवाडीतील बोबन (बबन)शंकऱ्या हिलम हा तेलंगण राज्यातील बोरगाव चौक येथील कोळसाभट्टीवर पत्नी व मुलासह कामाला गेला होता.
अलिबाग : सुधागड तालुक्यातील मुळशी कातकरवाडीतील बोबन (बबन)शंकऱ्या हिलम हा तेलंगण राज्यातील बोरगाव चौक येथील कोळसाभट्टीवर पत्नी व मुलासह कामाला गेला होता. गतवर्षी नोव्हेंबर २०१६ पासून तो बेपत्ता झाला. त्याचा थांगपत्ता लागत नसल्याने त्यांचा शोध करावा, अशी मागणी करणारे निवेदन त्यांची पत्नी पात्री बोबन हिलम, वडील शंकऱ्या भिवा हिलम व मुलगा दुऊ याचे निवेदन, शनिवारी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्याकडे देण्यात आले. बोबन शंकऱ्या हिलम यांचा तपास
करण्याचे आदेश दिल्याचे अनिल पारसकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
बोबन मुळशी कातकरवाडीत राहणारा कातकरी आहे. त्याला सात मुले असून त्याच्याबरोबर त्याचे वडील शंकऱ्या, पत्नी पात्री हिलम आणि त्याची मुले राहतात. बोबन सप्टेंबर २०१६मध्ये कामासाठी तेलंगणा राज्यातील बोरगाव चौक येथील कोळसाभट्टीवर गेला होता. त्याची पत्नी पात्री हिलम व त्यांचा एक मुलगाही होता. मात्र बोबन नोव्हेंबर २०१६पासून गायब झाल्याचे, पात्री ही जानेवारी २०१७मध्ये घरी मुळशीवाडीत आली, तेव्हा तिने घरच्यांना सांगितले. मुळशीवाडीतील ग्रामस्थ गुरुवारी जांभूळपाडा येथील पोलीसचौकीत बोबन बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यासाठी गेले. मात्र, तुम्हाला तेलंगणमधील पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवावी लागेल,असे सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर रिसर्च, ट्रेनिंग अॅण्ड डेव्हलपमेंट’या संस्थचे अजिंक्य हर्डिकर आणि रामदास थोरात यांच्या हा प्रकार लक्षात येऊन त्यांनी पोलिसांची मदत घेतली. (प्रतिनिधी)
बेपत्ता झालेल्या बोबन(बबन) हिलमच्या शोधाकरिता प्रयत्न सुरू आहेत. माझे काही आयपीएस बॅचमेट तेलंगण राज्यात पोलीस अधीक्षकपदी कार्यरत आहेत. त्यांच्याशी थेट संपर्क साधून सहकार्य घेण्यात येईल.
- अनिल पारसकर, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक
रायगड पोलिसांच्या सहकार्याने बोबन (बबन) हिलमचा शोध नक्की लागेल, यात शंका नाही.
-डॉ. चंद्रकांत पुरी, संचालक, मुंबई विद्यापीठ राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्र