पर्यावरणातून 'बोधिवृक्ष' नामशेष होण्याच्या मार्गावर!
By admin | Published: May 14, 2014 06:01 AM2014-05-14T06:01:25+5:302014-05-14T06:01:25+5:30
अवघ्या विश्वाला शांततेचा, प्रेमाचा, मित्रत्वाचा, बंधुत्वाचा, समतेचा आणि नैसर्गिक पर्यावरण संतुलनाचा संदेश देणारा पिंपळवृक्ष काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
अशोक खरात, खोडद -
अवघ्या विश्वाला शांततेचा, प्रेमाचा, मित्रत्वाचा, बंधुत्वाचा, समतेचा आणि नैसर्गिक पर्यावरण संतुलनाचा संदेश देणारा पिंपळवृक्ष काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तथागत गौतम बुद्धांनी 'बोधिवृक्षा'खाली म्हणजेच पिंपळवृक्षाखाली ध्यानस्थ होऊन ज्ञानप्राप्ती केली होती. सत्याचा साक्षात्कार झाल्यानंतर दु:खमुक्तीचा मार्ग शोधून संपूर्ण मानवजातीला दु:खमुक्त होण्यासाठी संदेश दिला, अशा तथागत गौतम बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीचा साक्षीदार असलेला आणि बौद्ध धम्मात पवित्र मानल्या जाणार्या महावृक्षांचा महाराजा म्हणून ओळखला जाणारा बोधिवृक्ष म्हणजेच पिंपळवृक्ष. या जुन्या व प्राचीन अशा पिंपळवृक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत असून, हा वृक्ष पर्यावरणातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणार्या या विशालवृक्षाचे पर्यावरणातून नामशेष होणे ही बाब पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक व बाधक ठरत आहे. या बोधिवृक्षाविषयी आळे (ता. जुन्नर) येथील बाळासाहेब जाधव महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्रज्ञ प्रा. डॉ. सविता संजयकुमार रहांगडाले 'लोकमत'शी बोलताना म्हणाल्या, की पिंपळ हा पूर्वी जवळपास प्रत्येक गावात सर्रासपणे पाहायला मिळत असायचा. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेचे पिंपळ व वटवृक्ष मोठ्या प्रमाणात तोडण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी पुन्हा ही झाडे लावण्यात आली नाहीत. हा वृक्ष विहिरींमध्ये, तसेच विहिरींच्या काठावर मोठ्याप्रमाणात दिसायचा. पण, या झाडावरील पक्ष्यांची विष्ठा विहिरीत पडते म्हणून अनेकांनी हे पिंपळ तोडले आहेत. पूर्वी पिंपळ सर्रासपणे दिसायचा, आता मात्र तो मंदिर व स्मशानभूमीच्या आवारात पाहावयास मिळतो. मोकळ्या जागेत पिंपळवृक्ष लावल्यास पर्यावरणासाठी निश्चितच फायदा होईल. पिंपळ हा खास करून हळद्या, पोपट, मैना आदी पक्षांचा आवडता वृक्ष आहे.