दफन मृतदेह पाच दिवसांनंतर काढला
By admin | Published: September 18, 2016 01:15 AM2016-09-18T01:15:27+5:302016-09-18T01:15:27+5:30
खासगी रुग्णालयात महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी त्याच रात्री महिलेला दफन केले.
मुंबई : खासगी रुग्णालयात महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी त्याच रात्री महिलेला दफन केले. मात्र, चुनाभट्टी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तब्बल पाच दिवसांनंतर हा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
झुलेखा खान (४६) असे या मृत महिलेचे नाव आहे. ती कुर्ला कुरेशीनगर परिसरातील गफार चाळीमध्ये कुटुंबासह राहत होती. तिला ९ सप्टेंबर रोजी बेशुद्धावस्थेमध्ये कुर्ल्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी आणि महिलेच्या कुटुंबीयांनी या मृत्यूची माहिती पोलिसांना न देताच तिचा मृतदेह पहाटेच्या वेळेस दफन केला. काही रहिवाशांकडून या संशयास्पद हालचालींची माहिती मिळताच पोलिसांनी स्मशानभूमी गाठली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर मृतदेह बाहेर काढून मृत्यूचे कारण समजून घेण्यासाठी पोलिसांनी तो जे.जे. रुग्णालयात पाठवला आहे.
झुलेखाचा मृत्यू पतीच्या मारहाणीत झाल्याचा संशय चुनाभट्टी पोलिसांना आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येईल, अशी माहिती झोन सहाचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली. (प्रतिनिधी)
मृत्यूचे कारण शोधणार
झुलेखा खान या महिलेला ९ सप्टेंबर रोजी बेशुद्धावस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे तिला मृत घोषित केले.
न कळवताच या महिलेचा मृतदेह दफन केल्यामुळे पोलिसांनी तपासासाठी तो पुन्हा जे. जे. रुग्णालयात पाठवला.