आंबोली दरीत पडलेल्या दुस-या युवकाचा सहाव्या दिवशी सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2017 01:14 PM2017-08-05T13:14:40+5:302017-08-05T22:48:13+5:30
सावंतवाडी, दि. 5 - आंबोली कावळेसाद पॉर्इंट येथील दरीत पडलेल्या दोघा युवकांपैकी एका युवकाचा मृतदेह शुक्रवारी दरीतून बाहेर काढल्यानंतर ...
सावंतवाडी, दि. 5 - आंबोली कावळेसाद पॉर्इंट येथील दरीत पडलेल्या दोघा युवकांपैकी एका युवकाचा मृतदेह शुक्रवारी दरीतून बाहेर काढल्यानंतर दुसरा मृतदेह शनिवारी सहाव्या दिवशी सांगेली व लोणवळ्याच्या ट्रॅकर्सनी संयुक्तपणे मोहीम राबवून रोपवेच्या साहय्याने बाहेर काढला. हा मृतदेह गडहिंग्लज येथील इम्रान गारदी यांचा असून, तो सायंकाळी उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, पोलीस वगळता प्रशासनाच्या अन्य अधिकाºयांकडून अपेक्षित असे सहकार्य मिळाले नसल्याने शोधमोहिमेचे प्रमुख बाबल आल्मेडा यांनी नाराजी व्यक्त केली.
आंबोली-कावळेसाद येथील पॉर्इंटवर सोमवारी ३१ जुलैला मद्यधुंद अवस्थेत मौजमजा करताना बीड येथील प्रताप उजगरे व गडहिंग्लज येथील इम्रान गारदी हे दरीत पडले होते. या दोघांचे मृतदेह खोल दरीत दिसत होते. पण काढताना अडचणी येत होत्या. कोल्हापूर तसेच स्थानिक शोध पथके मृतदेह वर आणण्यासाठी प्रयत्नशील होती. पण त्यांना यश येत नव्हते. अखेर कोल्हापूर येथील शोधपथक गुरूवारी सायंकाळी निघून गेले. त्यानंतर सांगेली येथील बाबल आल्मेडा व आंबोलीतील किरण नार्वेकर यांनी शुक्रवारी पुन्हा शोधमोहीम राबवली व बीड येथील प्रताप उजगरे यांचा मृतदेह रोपवेच्या साहय्याने वर आणला होता.
शनिवारी सकाळीच पुन्हा सांगेली येथील बाबल आल्मेडा तसेच आंबोलीचे किरण नार्वेकर यांनी शोध मोहिमेस सुरूवात केली. त्यांना लोणावळा येथील ट्रॅकर्सनीही मदत केली. त्याच्या या शोधमोहिमेला दुपारी यश आले. इम्रान गारदी याचाही मृतदेह प्रतापचा मृतदेह आढळलेल्या ठिकाणाजवळच आढळून आला आहे. त्यानंतर खाली स्ट्रेचर सोडून रोपवेने हा मृतदेह वर काढण्यात आला. यासाठी स्थानिक शोधपथकाबरोबर लोणावळा येथील ट्रॅकर्स गणेश गिध व रोहित वर्तक हे दोघे खाली उतरले होते.
पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी जाऊन केली पाहणी
आंबोली कावळेसाद पॉईंट येथील खोल दरीत कोसळलेल्या दोन युवकांचे मृतदेह मिळाल्यानंतर शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिक्षातकुमार गेडाम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच पर्यटकांनी धबधब्यावर येतना सावधानता बाळगावी असे आवाहन केले आहे. दारू पिऊन धिंगाणा घालणा-यांवर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील तसेच जादा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे असे पोलीस अधीक्षक डॉ दीक्षांतकुमार गेडाम यांनी सांगितले.