राजोडी समुद्रात बुडालेल्या चार मुलांचे मृतदेह सापडले
By Admin | Published: August 13, 2016 03:15 AM2016-08-13T03:15:55+5:302016-08-13T03:15:55+5:30
समुद्राला आलेल्या भरतीचा अंदाज न आल्याने नालासोपारा येथील चार मुले राजोडी येथील समुद्रात गुरुवारी दुपारी वाहून गेली. शुक्रवारी सकाळी पोलिसांनी हेलिकॉप्टर, पालिका
वसई : समुद्राला आलेल्या भरतीचा अंदाज न आल्याने नालासोपारा येथील चार मुले राजोडी येथील समुद्रात गुरुवारी दुपारी वाहून गेली. शुक्रवारी सकाळी पोलिसांनी हेलिकॉप्टर, पालिका अग्निशमन दल आणि मच्छीमारांच्या मदतीने हाती घेतलेल्या शोधमोहिमेत चौघांचेही मृतदेह राजोडी समुद्रकिनारी हाती लागले. दोघांना गावकऱ्यांनी वाचवले होते.
नालासोपारा येथील लक्ष्मीबेन छेडा मार्गावर राहणारी सात मुले दुपारी दोनच्या सुमारास पोहण्यासाठी विरार पश्चिमेकडील राजोडी बीचवर गेली होती. सातपैकी सहा जण समुद्रात पोहायला उतरली होती. भरतीच्या लाटेच्या तडाख्याने सहाही मुले समुद्रात खेचली गेली. यावेळी किनाऱ्यावर असलेले गावकरी मदतीसाठी धावले. सहापैकी दोघांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले.
मात्र, मोठी भरती असल्याने लाटेच्या तडाख्यात सनी पालव (१५), सचिन विश्वकर्मा (१६), रोहन जाधव (१७) आणि चेतन कालप (१९) ही चार मुले वाहून गेली होती. तर सचिन माळेकर (१६), नमन मिश्रा (१५) आणि अंकित शर्मा (१५) ही मुले बचावली होती. पोलिसांनी वसई विरार पालिकेच्या अग्निशमन दल आणि मच्छीमारांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेतली होती. पण, रात्री उशिरापर्यंत कुणाचाही पत्ता लागला नाही. शुक्रवारी सकाळी हेलिकॉप्टर आणि अग्निशमन दर तसेच मच्छीमारांच्या मदतीने पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. सकाळी चारही मुलांचे मृतदेह हाती लागले. (प्रतिनिधी)