सेनेच्या अंगात ‘जयस्वाल वारं’

By admin | Published: May 16, 2017 12:16 AM2017-05-16T00:16:21+5:302017-05-16T00:16:21+5:30

नागरिकांना फेरीवाल्यांचा त्रास होत असूनही अधिकारी कारवाई करत नसल्याने शिवसेना अकारण बदनाम होत असल्याचा आरोप करून युवा सेनेने

In the body of the army, 'Jaiswal Waram' | सेनेच्या अंगात ‘जयस्वाल वारं’

सेनेच्या अंगात ‘जयस्वाल वारं’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : नागरिकांना फेरीवाल्यांचा त्रास होत असूनही अधिकारी कारवाई करत नसल्याने शिवसेना अकारण बदनाम होत असल्याचा आरोप करून युवा सेनेने सोमवारी संध्याकाळी अचानकपणे डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू केली. जोवर फेरीवाले हटत नाहीत, तोवर आम्ही आंदोलन करू, असे जाहीर करताना त्यांच्यावर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा इशाराही युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. या आंदोलनप्रकरणी रामनगर पोलिसांनी नंतर चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत आंदोलनाची भूमिका जाहीर केली आणि कार्यकर्त्यांनी लगेचच फेरीवाल्यांचा माल उधळून देत त्यांना पळता भुई थोडी केली. कल्याण-डोंबिवली महापालिकेत मोजका अपवाद वगळता दोन दशके शिवसेनेचीच सत्ता आहे. त्यामुळे आपल्याच सत्तेविरोधात शिवसेनेला आंदोलन करता येत नसल्याने युवा सेनेच्या कार्यकर्त्यांमार्फत हे आंदोलन केल्याची चर्चा नंतर शाखेत रंगली.
डोंबिवली स्टेशन परिसराला फेरीवाल्यांचा विळखा आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यास कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी कुचकामी ठरले आहेत. ते षंढ आहेत. ठाण्याचे आयुक्त फेरीवाल्यांविरोधात रस्त्यावर उतरले. पण कल्याण- डोंबिवली अधिकारी रस्त्यावर उतरुन कारवाई करत नाहीत. फेरीवाला हटाव पथकातील अधिकारीही प्रभावी कारवाई करीत नाही. त्याचा त्रास नागरिकांना होतो. स्टेशन परिसरात फेरीवाल्यांनी पदपथ गिळंकृत केले आहेत. त्याची दखल पालिकेकडून घेतली जात नसल्याने सायंकाळी युवा सेनेचे जिल्हाधिकारी दीपेश म्हात्रे, शहर अध्यक्ष अवधूत पांचाळ, मुकेश पाटील, योगेश म्हात्रे आणि महिला आघाडीच्या प्रमुख कविता गावंड आदी शिवसेनेच्या शहर शाखेत जमले आणि भगवे झेंडे घेत, गळ््यात पक्षाचा मफलर घालून ते स्टेशनच्या दिशेने निघाले. सोमवारचा बाजार असल्याने स्टेशन परिसर, पूजा-मधुबन टॉकीजची गल्ली, मानपाडा रस्ता येथे फेरीवाले मोठ्या प्रमाणात होते. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून जवळच असलेल्या इंदिरा गांधी चौकात फेरीवाल्यांचे साहित्य उधळून लावण्यास कार्यकर्त्यांनी सुरुवात केली. दाते रुग्णालयासमोर लावण्यात आलेली फेरीवाल्यांची दुकाने आणि बाकडी फेकून दिली. तेथील एका फेरीवाल्या महिलेने आंदोलनाला विरोध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिला शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी काहीही बोलू दिले नाही. त्यानंतर मोर्चा वळला, तो रिक्षा स्टॅण्डलगत असलेल्या फूटपाथकडे. आंदोलनकर्ते स्टेशन परिसरातील पादचारी पुलाकडून ते मधुबन टॉकीजच्या गल्लीत गेले. फेरीवाल्यांनी तेथील चिंचोळी गल्ली बळकावली आहे. तेथील दुकानांबाहेर लटकावलेले कपडे, लिंबू सरबतच्या गाड्या, पाणीपुरी व भेळपुरीच्या गाड्या त्यांनी उलट्या केल्या. त्यावरील साहित्य फेकून दिले. ज्या दुकानांचा माल फुटपाथवर, रस्त्यावर होता, त्यांची अतिक्रमणे, त्यांचा माल कार्यकर्त्यांनी फेकून दिला. स्टेशन परिसरातून कार्यकर्ते शुभमंगल कार्यालयाच्या दिशेने गेले. तेथे भाजी विकणाऱ्या फेरीवाल्यांचाही माल फेकून दिला. पाठोपाठ रामनगर पोलिसांची गाडी आली. त्यांनी चार कार्यकर्त्याना ताब्यात घेतले.


मनसे नगरसेवकावर
हप्ते घेतल्याचा आरोप
मनसेचे स्थानिक नगरसेवक आणि गटनेते मंदार हळबे हे फेरीवाल्यांकडून हप्ते घेत असल्याने फेरीवाले हटत नसल्याचा खळबळजनक युवा सेनेचे जिल्हाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी केला. पालिकेचे अधिकारी फेरीवाल्यांविरोधात कारवाई करीत नाहीत. त्यामुळे शिवसेनेचे नाव खराब होत आहे. शिवसेना सत्तेत असली, तरी जनतेला त्रास झाला; तर आंदोलन करणार. हे आंदोलन एका दिवसापुरते नाही. फेरीवाले हटेपर्यंत ते सतत सुरू राहील. त्यानंतरही मस्तवाल अधिकारी कारवाई करीत नसतील, तर युवा सेनेचे कार्यकर्ते अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासतील, असा इशारा त्यांनी दिला.

स्वत: हप्ते घेणाऱ्यांनी दुसऱ्यावर टीका करू नये!
शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेसमोर आणि शहरात इतरत्र शिव वडापावच्या नावाखाली उत्तर भारतीयांना गाड्या चालविण्यास देणाऱ्यांनी, त्यांच्याकडून हप्ता उकळणाऱ्यांनी आमच्यावर आरोप करू नयेत, असा प्रतिहल्ला मनसेचे नगरसेवक मंदार हळबे यांनी चढवला. युवा सेनेचा आरोप निराधार व बिनबुडाचा आहे. फेरीवाल्याकडून हप्ते घेऊन चरित्रार्थ चालविण्या इतकी वाईट वेळ माझ्यावर आलेली नाही. शिवसेनेच्या नेत्यांचा फेरीवाल्यावर कंट्रोल नाही. प्रशासनावर वचक नाही. त्यामुळे सत्तेत राहूनही शिवसेना कुचकामी ठरली आहे. त्यांना नागरिकांची इतकीच काळजी असेल, तर सत्तेतून बाहेर पडून शिवसेनेने विरोधी पक्षाची भूमिका बजावावी, असा टोला हळबे यांनी लगावला.

भाजपाचे काळे, मनसेची टीका सेना नेत्यांना झोंबली?
शिवसेनेच्या शहर शाखेने भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पुतळा जाळला. प्रत्त्युत्तर म्हणून भाजपाने शिवसेनेच्या मुखपत्राचे अंक जाळले आणि शिवसेनेचे शहरप्रमुख भाऊ चौधरी यांच्या तोंडाला काळे फासले. ते शिवसेनेच्या जिव्हारी लागले. त्यावरुन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांची कानउघाडणी केली. शिवसेनेने दानवेचा पुतळा जाळण्यापेक्षा शहरातील फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करावे, अशी तिरकस टीका मनसेने केली होती. त्याचेच प्रतिबिंब युवा सेनेच्या आंदोलनात उमटले. सत्तेत असलेली शिवसेना जनतेच्या प्रश्नांपासून दूर चालल्याची टीका होत असल्याने युवा सेनेच्या माद्यमातून शिवसेनेला रस्त्यावर उतरावे लागल्याची चर्चा नंतर शाखेत सुरू झाली.

Web Title: In the body of the army, 'Jaiswal Waram'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.