बेपत्ता बालकाचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2015 05:10 AM2015-05-11T05:10:41+5:302015-05-11T05:10:41+5:30
रांजणी येथून चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ओम कोळी (५) या मुलाचा मृतदेह विहिरीत आढळून आला.
जामनेर (जि. जळगाव) : रांजणी येथून चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ओम कोळी (५) या मुलाचा मृतदेह विहिरीत आढळून आला. नरबळीसाठी त्याची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, घटनेनंतर विचारपूस करण्यासाठी आलेल्या नेत्यांवर संतप्त ग्रामस्थांनी दगडफेक करून त्यांना पिटाळून लावले. यामुळे गावात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
ओम कोळी हा ६ मे रोजी घराजवळच खेळत असताना बेपत्ता झाला होता. तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता. बेटावद शिवारातील गजानन नामदेव पाटील यांच्या शेतातील विहिरीवर दुुपारच्या वेळी पाणी घेण्यासाठी ओमचा मोठा भाऊ आला त्या वेळी ओमचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.
ओमच्या गळ्यावर वळ दिसून आले, शिवाय नाका, तोंडाद्वारे रक्तही आल्याचे दिसत होते. नरबळीसाठी त्याची हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी पोलीस बंदोबस्तात ओमवर अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)