बेपत्ता नगरसेविकेचा मृतदेह सापडला
By Admin | Published: October 3, 2015 03:52 AM2015-10-03T03:52:53+5:302015-10-03T03:52:53+5:30
नेरूळ येथून गेल्या आठवड्यात बेपत्ता झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका शशिकला मालदी यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
नवी मुंबई : नेरूळ येथून गेल्या आठवड्यात बेपत्ता झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका शशिकला मालदी यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. मानखुर्द - गोवंडीदरम्यान रेल्वेच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला असून, त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. बेपत्ता झाल्याच्या दिवशीच त्यांचा मृत्यू झाला असून, १० दिवसांनी ही घटना उघड झाली आहे.
२३ सप्टेंबरपासून प्रभाग ८८च्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका शशिकला मालदी बेपत्ता होत्या. याप्रकरणी २८ तारखेला कुटुंबीयांनी त्या मानसिक तणावात घर सोडून गेल्याची तक्रार नेरूळ पोलिसांकडे केली होती. एक महिला लोकप्रतिनिधी बेपत्ता झाल्याची शहरातली पहिलीच घटना असल्याने उपायुक्त शहाजी उमाप, साहाय्यक आयुक्त धनराज दायमा, वरिष्ठ निरीक्षक संगीता अल्फान्सो यांनी तपासाकरिता दोन पथके तयार केली होती. या पथकाने सर्वत्र शोध घेतल्यानंतर मुंबई, नवी मुंबई व परिसरात आढळलेल्या बेवारस मृतदेहांची माहिती मिळवली. यावेळी गोवंडी येथे रेल्वेच्या धडकेने एका महिलेचा मृत्यू झाला असून तिची ओळख पटलेली नसल्याचे समजले. या मृतदेहाची पाहणी करुनही पोलिसांना ओळख पटली नाही. अखेर शुक्रवारी कपड्यावरून तो मृतदेह मालदी यांचा असल्याची खात्री पटली. त्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी नेरूळच्या स्मशानभूमी मध्ये शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आहे. माजी मंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक, पालिका अधिकारी यावेळी उपस्थित होते.
अपघातानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी रेल्वे पोलिसांनी सर्वत्र चौकशी केली होती. त्यावेळी मालदी यांच्या बेपत्ता होण्याची तक्रारच झालेली नव्हती. यामुळे त्यांचा मृतदेह बेवारस म्हणून मुंबईच्या राजावाडी रुग्णालयात होता. अखेर दहा दिवसांनी नेरूळ पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला.
एप्रिल महिन्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग ८८ मधून मालदी निवडून आल्या होत्या. तेव्हापासून प्रभागात विरोधकांच्या कुरघोडीचा त्यांना त्रास होत होता. त्यांच्या जात प्रमाणपत्रावरही विरोधकांनी आक्षेप घेतलेला आहे. तर गणेशोत्सवापूर्वी मंडप उभारणीवरून झालेल्या वादात त्यांच्यावर हल्ल्याचाही प्रयत्न झाला होता. याचा प्रचंड मनस्ताप झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
घटनेच्या दिवशी मालदी यांनी पर्स किंवा मोबाइल सोबत नेला नव्हता. यामुळे त्या गोवंडीपर्यंत पोचल्या कशा व अपघातापूर्वीचे काही तास त्या कुठे होत्या, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
चौकशीची मागणी
नेरूळची महिला गोवंडीला जावून आत्महत्या करते, ही न पटणारी बाब आहे. त्यामुळे या प्रकरणाची सी.आय.डी. मार्फत चौकशी करून ही आत्महत्या आहे की हत्या याचा उलगडा करण्याची मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.