बेळगावजवळ सापडलेला मृतदेह रुद्रगौडाचा ?
By admin | Published: October 29, 2015 12:43 AM2015-10-29T00:43:34+5:302015-10-29T00:47:16+5:30
पोलिसांकडून दुजोरा नाही : कर्नाटक सीआयडीचे पथक बेळगावात दाखल
बेळगाव : जिल्ह्यातील खानापूरच्या जंगलात गोळ््या घालून खून करण्यात आलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. तो ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि पुरोगामी विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्याप्रकरणात दोन संशयित मारेकऱ्यांपैकी एकाच्या रेखाचित्राशी साधर्म्य असणारा आहे. सनातनचा साधक रुद्रगौडा पाटील याचा हा मृतदेह असल्याच्या वृत्ताने बुधवारी एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही. कर्नाटकच्या सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हेमंत निंबाळकर या प्रकरणाच्या चौकशीसाठी बेळगावात रात्री दाखल झाले आहेत.
खानापूरजवळील माणिकवाडी येथील जंगलात ग्रामस्थांना १८ आॅक्टोबर रोजी एक अनोळखी मृतदेह दिसला. (पान १ वरून) त्याला गोळ््या घालून ठार करण्यात आले असावे, असे त्याच्या शरीरावरील गोळ््यांच्या व्रणांनी दिसत होते. त्यातील एक गोळी छातीवर आणि दुसरी पोटावर मारण्यात आली आहे. या मृतदेहाची ओळख न पटल्याने पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदन केल्यानंतर मंगळवारी त्याचे दफन केले.
जंगलात सापडलेल्या मृतदेहाचे छायाचित्र खानापूर येथील एका व्यक्तीने मोबाईलवर काढले होते. तो मृतदेह आणि कलबुर्गी यांच्या हत्येनंतर जाहीर केलेले मारेकऱ्याचे रेखाचित्र यात साम्य असल्याचे छायाचित्र काढलेल्या व्यक्तीच्या ध्यानात आले. नंतर त्याने मृतदेहाचे छायाचित्र आणि कलबुर्गी
यांच्या मारेकऱ्याचे पोलिसांनी जाहीर केलेले रेखाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानंतर काही वृत्तवाहिन्यांनी कलबुर्र्गी यांच्या मारेकऱ्याच्या चेहऱ्याशी अज्ञात मृतदेहाचे साम्य असल्याची
ब्रेकिंग न्यूज दाखवायला सुरू केल्यावर सापडलेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हा मडगाव येथे २००९ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर बेपत्ता असलेल्या रुद्रगौडा पाटीलचा असावा, अशीदेखील चर्चा रंगू लागली.
वयातील फरक
अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचे वय २५ ते ३० दरम्यान असण्याची शक्यता असून, रुद्रगौडाचे वय सध्या ४० किंवा त्यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा मृतदेह रुद्रगौडाचा असण्याची शक्यता कमी असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.
गावठी पिस्तुलातून गोळ््या झाडल्याचा संशय
घटनास्थळी गोळीची पुंगळी सापडली आहे. त्यावरून हा खून गावठी पिस्तुलाने १७ आॅक्टोबर रोजी केला असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
उमादेवीना मृतदेहाचे छायाचित्र दाखवणार
दरम्यान, या मृतदेहाचे छायाचित्र कलबुर्गी यांच्या पत्नी उमादेवी यांना तसेच त्यांच्या एका प्रत्यक्षदर्शी शेजाऱ्याला दाखविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. ३० आॅगस्ट रोजी सकाळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी कलबुर्गी यांची गोळ््या घालून हत्या केली होती. या हल्लेखोरांना उमादेवींनी पाहिले होते. तसेच घराबाहेर मोटारसायकलजवळ थांबलेल्या एका हल्लेखोराला त्यांच्या शेजाऱ्याने पाहिले होते.
मृतदेह पुन्हा बाहेर काढणार
कर्नाटक सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हेमंत निंबाळकर रात्री बेळगावात दाखल झाले असून, त्यांच्या उपस्थितीत खानापूर पोलिसांनी दफन केलेला तो मृतदेह पुन्हा बाहेर काढून त्याचा पुन्हा पंचनामा केला जाण्याची शक्यता आहे.
सकृतदर्शनी कलबुर्गी यांच्या हत्येतील मारेकऱ्याचे रेखाचित्र आणि या मृतदेहाचा चेहरा यात साम्य दिसत असले तरी हा तो मारेकरीच असावा, या निष्कर्षापर्यंत अद्याप आम्ही आलेलो नाही.
- बी. आर. रविकांतेगौडा,
जिल्हा पोलीस अधीक्षक, बेळगाव