देहूत बीजसोहळा: इंद्रायणीकाठी लोटला भक्तिसागर; लाखो वैष्णव तुकोबाच्या चरणी लीन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 02:40 AM2020-03-12T02:40:59+5:302020-03-12T02:41:24+5:30
सनई-चौघडा व ताशांच्या गजरात साडेदहा वाजण्याच्या सुमारास पालखी मंदिरातून गोपाळपुºयाकडे रवाना झाली.
देहूगाव : राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे साडेतीन लाख वैष्णवांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा ३७२वा बीजसोहळा श्रीक्षेत्र देहूगाव येथे बुधवारी अनुभवला. रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता सोहळ्यात तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक झाले. इंद्रायणीकाठी भक्तिसागर लोटला होता.
श्री संत तुकाराम महाराज बीजसोहळ्याला पहाटे तीन वाजल्यापासून काकड आरतीने सुरू झाली. संस्थानचे माजी विश्वस्त विश्वजीत महाराज मोरे यांच्या हस्ते काकडारती झाली. काकडारतीनंतर देवस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे व विश्वस्त संतोष महाराज मोरे, अजित महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा केली. शिळा मंदिरात विश्वस्त संजय महाराज मोरे यांच्या हस्ते पूजा केली. वैकुंठगमन मंदिरातील श्री संत तुकाराम महाराजांची महापूजा विश्वस्त माणिक महाराज मोरे व विशाल महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली. संस्थानच्या वतीने मंदिराच्या गाभाºयात आणि गोपाळपुरा येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर आणि नांदुरकीच्या झाडाखालील पारावर फुलांची आकर्षक सजावट केली होती.
सनई-चौघडा व ताशांच्या गजरात साडेदहा वाजण्याच्या सुमारास पालखी मंदिरातून गोपाळपुºयाकडे रवाना झाली. पालखी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वैकुंठगमन मंदिराच्या आवारात प्रदक्षिणा घालून येथील नांदुरकीच्या झाडाखाली आली. पुरुषोत्तम महाराज मोरे-देहूकर यांचे सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत परंपरेप्रमाणे श्री संत तुकाराममहाराजांच्या वैकुंठगमन प्रसंगावरील कीर्तन झाले. येथील कीर्तन संपल्यावर दुपारी बारा वाजता ‘बोला पुंडलिका वरदा हरि विठ्ठल’, असा हरिनामाचा व श्री संत तुकाराममहाराजांच्या नामाचा गजर करीत भाविकांनी येथील नांदुरकीच्या झाडावर पुष्पवृष्टी केली.