अंबरनाथमध्ये बोगस कॉल सेंटर

By admin | Published: June 10, 2017 03:04 AM2017-06-10T03:04:25+5:302017-06-10T03:04:25+5:30

कर्जाचे आमिष दाखवून अमेरिकन नागरिकांना लुबाडणाऱ्या अंबरनाथ येथील बोगस कॉल सेंटरचा ठाणे पोलिसांनी गुरुवारी रात्री पर्दाफाश केला.

Bogass Call Center in Ambernath | अंबरनाथमध्ये बोगस कॉल सेंटर

अंबरनाथमध्ये बोगस कॉल सेंटर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कर्जाचे आमिष दाखवून अमेरिकन नागरिकांना लुबाडणाऱ्या अंबरनाथ येथील बोगस कॉल सेंटरचा ठाणे पोलिसांनी गुरुवारी रात्री पर्दाफाश केला. या प्रकरणी आठ आरोपींना अटक केली असून, आणखी १८ संशयितांची चौकशी सुरू आहे.
अंबरनाथ (पूर्व) येथील रमेश एंटरप्रायजेसच्या इमारतीमध्ये माउंट लॉजिक सोल्युशन्स या नावाने सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरमध्ये हा उद्योग सुरू होता. कर्जाच्या नावाखाली या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांची लुबाडणूक सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस आयुक्तांना मिळाली होती. त्यानुसार, गुन्हे शाखेचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी तातडीने सूत्रे हलवून गुरुवारी रात्री ११च्या सुमारास येथे धाड टाकली. इमारतीच्या तळ मजल्यावर सुमारे तीन हजार चौरस फूट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या या कॉल सेंटरमधून रात्री ८.३० ते पहाटे ५ वाजेपर्यंत हा उद्योग चालायचा. येथील कॉलर्स अमेरिकन नागरिकांशी कोलंबस बँकेच्या नावे व्हीओआयपी कॉलद्वारे संपर्क साधायचे. त्यांना विविध प्रश्न विचारून कर्जाचे आमिष दाखवायचे. नागरिकाने तयारी दाखवली की, काही दिवसांनी पुन्हा संपर्क साधून कर्ज मंजूर झाले. परंतु, त्यासाठी १०० ते ५०० डॉलर्सपर्यंत प्रक्रिया शुल्काची (प्रोसेसिंग फी) मागणी केली जायची. हे प्रक्रिया शुल्क देण्यासाठी तेवढ्या रकमेचे आयट्यूनकार्ड विकत घेण्यास सांगून कार्डवरील १६ अंकी क्रमांक त्यांच्याकडून घेतला जायचा. हा १६ अंकी क्रमांक कॉल सेंटरच्या व्यवस्थापकास दिला जायचा. व्यवस्थापकामार्फत हा १६ अंकी क्रमांक ‘कॅश’ करण्यासाठी पुढे पाठवला जायचा. २०१५ सालापासून हा उद्योग सुरू असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी ३१ संगणकाच्या हार्डडीस्क, ३ लॅपटॉप आणि काही कागदपत्रे हस्तगत केले आहेत. सर्व आरोपी २० ते २२ वर्षे वयोगटातील आहेत.
येथे २५ कॉलर्स कामाला होते. त्यापैकी आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली. बहुतांश आरोपी बारावीपर्यंत शिकलेले असून, कॉल सेंटरमध्ये काम करण्याचा अनुभव त्यांना होता. नवी मुंबईतील खारघर येथील गुरुप्रसाद श्रेयन, अंबरनाथ येथील देवेश येरलेकर, सचिन चिंचोळकर, प्रमोद दिनकर, वसीम शेख, मोहन कुळकर्णी, शरण राव आणि रोहन गेडाम ही आरोपींची नावे असून त्यापैकी श्रेयन, येरलेकर आणि चिंचोळकर हे यामागचे सूत्रधार असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Bogass Call Center in Ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.