बनावट कागदपत्रांद्वारे बोगस सैन्यभरती!
By admin | Published: August 25, 2016 05:08 AM2016-08-25T05:08:11+5:302016-08-25T05:08:11+5:30
बोगस सैन्यभरती प्रकरणात दिल्लीतील १०५ राजपुताना रायफल्समधील शिपाई संशयित गिरीराज घनश्याम चव्हाण (मूळ रा़ राजस्थान) यास नाशिक पोलिसांनी अटक केली
नाशिक : सैन्यात नोकरीचे आमिष दाखवून दिल्लीमध्ये राबविण्यात आलेल्या बोगस सैन्यभरती प्रकरणात दिल्लीतील १०५ राजपुताना रायफल्समधील शिपाई संशयित गिरीराज घनश्याम चव्हाण (मूळ रा़ राजस्थान) यास नाशिक पोलिसांनी अटक केली आहे़ त्यास न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बोगस सैन्यभरतीच्या या रॅकेटने सेना दलात खळबळ उडाली
आहे. चव्हाण याने दिल्लीतील दोन साथीदारांची नावे सांगितली असून त्यांना दिल्लीमध्ये बुधवारी (दि़ २४) अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे़ विशेष म्हणजे बोगस कागदपत्रांद्वारे भरती झालेले हे युवक देशातील विविध सैन्यदलाच्या प्रशिक्षण कें द्रांमध्ये प्रशिक्षण घेत होते़
नाशिकरोड येथील आर्टिलरी सेंटरमध्ये संशयित बालवीर गुजर (२२, राजस्थान), सचिन किशनसिंग (१९,रा़ राजस्थान), तेजपाल चोपडा (१९, रा़ राजस्थान) व सुरेश महंतो (२१, रा़ राजस्थान) हे चौघे प्रशिक्षण घेत होते़ त्यांनी लष्करी अधिकाऱ्यांकडे प्रशिक्षणासाठी सोपविलेली दिल्ली येथील सैन्यभरतीची कागदपत्रे बनावट व खोटी असल्याचे ११ जुलै २०१६ रोजी उघड झाले होते़ त्यांना लष्करी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन नाशिकरोड पोलिसांकडे सुपूर्द केले असता त्यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला़
दिल्लीमध्ये सैन्यभरतीचे आमिष दाखवून बोगस कागदपत्रांद्वारे भरती करून फसवणूक केल्याचे समोर आले़ ही फसवणूक व बोगस सैन्यभरतीमध्ये दिल्लीतील लष्करी शिपाई गिरिराज चव्हाण व एजंटचे रॅकेट सहभागी असल्याचे पोलीस तपासात समोर आले़ नाशिकरोड पोलिसांनी संशयित शिपाई गिरिराज चव्हाण यास दोन दिवसांपूर्वी अटक करून न्यायालयात हजर केले.
सुमारे ५० युवकांना बोगस कागदपत्रे तयार करून देत त्यांची आर्थिक लूट करण्यात आल्याचे समोर आले आहे़ (प्रतिनिधी)
>युवकांना सैन्य भरतीचे आमिष दाखवून दिल्लीमध्ये ही बनावट सैन्यभरती प्रक्रिया राबविण्यात आल्याचे समोर आले आहे़ सुमारे ५० युवकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. लष्करी अधिकारी व एजंटांचे मोठे रॅकेट असून त्यातील तिघांना आतापर्यंत अटक केली आहे़
- श्रीकांत धिवरे, पोलीस उपआयुक्त, नाशिक