बोगस नावे मतदारांच्या गळ्यात
By admin | Published: May 4, 2017 06:04 AM2017-05-04T06:04:12+5:302017-05-04T06:04:12+5:30
तुमचे नाव मतदार यादीत दोनदा असेल तर तुम्ही नेमके कोणत्या ठिकाणी मतदान करणार किंवा कोणत्या मतदानकेंद्रावर
भिवंडी : तुमचे नाव मतदार यादीत दोनदा असेल तर तुम्ही नेमके कोणत्या ठिकाणी मतदान करणार किंवा कोणत्या मतदानकेंद्रावर मतदान करणार ते आम्हाला पाच दिवसांत लेखी कळवा, अशी जाहिरात प्रसिद्ध करून भिवंडी पालिकेतील निवडणूक विभागाने यादीतील बोगस नावांवर तोडगा काढला आहे. या नावांवर खुणा करून याद्या प्रसिद्ध करा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले असतानाही निवडणूक विभागाने बोगस नावांची जबाबदारी मतदारांच्या खांद्यावर टाकली आहे. पालिकेच्या या कृतीविरोधात याचिकाकर्त्यांनी संताप व्यक्त केला असून हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
मतदारयादीत निम्मी नावे बोगस असल्याचा आरोप करणारी आणि दोन मतदारसंघांत ग्रामीण भागातील नावे घुसवल्याचा आरोप करणाऱ्या याचिका दाखल झाल्यावर अशा सदोष याद्या असतानाही निवडणूक का जाहीर केली, असा प्रश्न न्यायालयाने विचारला होता. त्यानंतर अशा नावांवर खुणा करून नव्याने याद्या प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यावर पालिकेच्या निवडणूक विभागाने जाहिरात प्रसिद्ध करून ज्यांची नावे यादीत दुसऱ्यांदा आली आहेत, त्यांना ३ ते ७ मे दरम्यान पालिकेत येऊन नेमक्या कोणत्या मतदारसंघात आणि कोणत्या मतदानकेंद्रात मतदान करणार ते कळवण्यास सांगितले आहे. त्याला प्रतिसाद न मिळाल्यास मतदानावेळी दुबार नावांमुळे प्रचंड गोंधळ उडण्याची, मोठ्या प्रमाणात बोगस मतदान होण्याची शक्यता आहे. ज्या कारणासाठी मतदारयादीला आव्हान देण्यात आले होते आणि न्यायालयाने याद्यांवर खुणा करण्याचा आदेश दिला होता, ते न करता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाहिरात प्रसिद्ध करून आपली सुटका करून घेतली आहे. केंद्रनिहाय यादीत अद्याप दुबार नावांसमोर खुणा करण्यात आलेल्या नाहीत, अशी कबुली निवडणूक विभागप्रमुख श्रीकांत औसरकर यांनी दिली.
राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी मात्र दुबार नावे काढणे ही पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील विभागाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचवेळी या याद्या जानेवारीत तयार केल्या असून सप्टेंबरमध्येच त्यावर हरकती-सूचना मागवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भिवंडीच्या निम्म्या मतदारसंघांत बोगस नावे असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका दाखल झाल्यानंतर आणि ग्रामीण भागातील नावे घुसवण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर ही नावे वगळण्यासाठी न्यायालयाने मतदारयाद्यांवर खुणा करण्याचे आदेश दिले होते. त्यातून यादीत दुसऱ्यांदा आलेली नावे समजतील, हा हेतू होता. मात्र अशा खुणा न करताच याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. उलट निवडणूक विभागाने मतदारांनाच आवाहन केले. ७ एप्रिलला याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यावर २४ एप्रिलला न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने आदेश काढला असून त्यानुसार ३ ते ७ मे दरम्यान मतदारांनी येऊन कुठे मतदान करणार ते कळवावे, असे पालिकेच्या निवडणूक विभागाने जाहीर केले. वस्तुत: बोगस आणि दुबार नावांसमोर खूण करून ती यादी ६ मे पर्यंत प्रसिध्द करावी, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाला दिल्यानंतरही त्यानुसार मतदारयादी दुरूस्त करण्यात आलेली नाही.
पालिकेच्या या कारभाराविरोधात याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पवित्रा घेतला आहे. पण त्यांना आणि राज्य निवडणूक आयोगालाही अद्याप उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळालेली नाही.
दरम्यान, निवडणूक आयुक्त सहारिया यांनी बुधवारी सायंकाळी भिवंडीला भेट देऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला.
हा कोर्टाचा अवमान
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक यंत्रणा काम करत नाही. दुबार मतदारांना आपल्या कार्यालयांत येऊन ते कोणत्या केंद्रातून मतदान करणार असल्याचे नोंद करण्यास ते सांगत आहेत. तशी जाहिरात निवडणूक विभागाने वर्तमानपत्रात दिली. त्यामुळे कोर्टाचा अवमान होतो आहे.
- सिध्देश्वर कामूर्ती, याचिकाकर्ते
काय घडले होते?
संजय काबुकर, सिध्देश्वर कामूर्ती आणि फाजील अन्सारी यांनी उच्च न्यायालयांत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर २६ एप्रिलला निकाल देताना उच्च न्यायालयाने या नावांसमोर ६ मे पूर्वी खुणा करून नंतरच त्या याद्या प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते.
बोगस मतदारांचे काय?
पालिकेने प्रसिध्द केलेल्या मतदारयादीत दुबार मतदारांसह बोगस नावे आहेत. ग्रामीण भागातील नावे घुसडण्यात आली आहेत. त्याबाबत आमची निवडणूक आयोगाकडे तक्रार होती. दुबार नावांसमोर खुणा करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला असला, तरी बोगस नावांचा विषय अनुत्तरीत आहे. त्यामुळे हे मतदान पारदर्शक होईल, असे कसे म्हणता येईल? एकीकडे मतदान प्रक्रिया सुरू आहे. मात्र उच्च न्यायालयाचा लेखी निर्णय न मिळाल्याने पुढील हालचाली थांबल्या आहेत.
- संजय काबूकर, याचिकाकर्ते
खुणा करून काय होणार? : भिवंडी महानगरपालिकेच्या मतदारयादीतील दुबार नावांबाबत आमची तक्रार होती. त्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर २६ एप्रिलला न्यायालयाने निकाल दिला, पण त्याने आमचे समाधान झाले नाही. केवळ नावांवर खुणा करून हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जायचे आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक यंत्रणा काम करीत नसेल, तर आम्ही अवमान याचिकाही दाखल करू. - फाजील अन्सारी, याचिकाकर्ता