बोगस फौजदार भरतीवर शिक्कामोर्तब
By admin | Published: September 6, 2016 04:26 AM2016-09-06T04:26:02+5:302016-09-06T04:26:02+5:30
राज्याच्या पोलीस मोटर परिवहन (एमटी) विभागात फौजदारांची बोगस भरती झाल्याबाबत शिक्कामोर्तब झाले
यवतमाळ : राज्याच्या पोलीस मोटर परिवहन (एमटी) विभागात फौजदारांची बोगस भरती झाल्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे. एका अतारांकित प्रश्नाच्या निमित्ताने गृहसचिवांना दिलेल्या उत्तरातून ही बाब उघड झाली आहे. परंतु अद्याप या प्रकरणी पोलीस महासंचालक कार्यालयाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यासाठी एका जनहित याचिकेचा आडोसा घेतला जात आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी एमटीतील फौजदार भरतीबाबत अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर यांनी अपर मुख्य सचिव (गृह) यांना ६ आॅगस्ट २०१६ रोजी उत्तर सादर केले. त्यात या भरतीबाबत २ डिसेंबर २००९ रोजी तक्रार दाखल झाल्याने गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस महानिरीक्षक डॉ. माधव सानप यांनी चौकशी अहवाल सादर केल्याचे या उत्तरात म्हटले आहे. मात्र कारवाई का केली नाही, या प्रश्नाला उत्तर देताना न्यायालयाचा आडोसा घेऊन बगल देण्यात आली.
सन २००९ ला पोलीस मोटर परिवहन विभागात फौजदारांच्या ७२ जागांसाठी ही भरती घेण्यात आली होती. त्यात अर्ध्या अधिक अपात्र उमेदवारांना फौजदारपदी नियुक्ती देण्यात आली. त्यात मोठा व्यवहार झाल्याचे सांगितले जाते. त्यात एमटीच्या तत्कालीन मपोसे एसपींनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जाते. या बोगस भरतीच्या सुरुवातीला डॉ. सानप यांनी चौकशी करून २ डिसेंबर २००९ ला अहवाल सादर केला. त्यानंतर एमटीचे एसपी प्रकाश आचरेकर यांनी ४ जुलै २०१६ ला अहवाल सादर केला. या दोन्ही अहवालात अपात्र उमेदवारांना फौजदार बनविल्याचे नमूद आहे. मात्र त्यानंतरही पोलीस महासंचालक कार्यालय या अपात्र उमेदवारांना बाद ठरविण्याची कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. अखेर कारवाई व्हावी म्हणून एमटीचे सेवानिवृत्त उपअधीक्षक ए.जी. इनामदार यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (क्र.एसटी-७७/२०१४) दाखल केली. न्यायालयाच्या सूचनेवरून इनामदार यांनी पुणे शहरातील चतु:शृंगी पोलीस ठाण्यात ३१ मे २०१६ ला रितसर फिर्याद नोंदविली. मात्र अद्याप ना गुन्हा दाखल झाला ना अपात्र उमेदवारांवर कारवाई झाली. आता तर याच याचिकेचा आडोसा घेऊन महासंचालक क ार्यालय प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कारवाई न केल्याचे सांगत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
>पदोन्नतीची तयारी
आधीच अपात्र आणि त्यात फौजदारपदी नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांना आता तर पदोन्नती देण्याची तयारीही पोलीस मोटर परिवहन विभागात सुरू असल्याची माहिती आहे. या भरतीचे सूत्रधार मानल्या जाणाऱ्या मपोसे एसपीला नागपाळा येथे डीआयजी म्हणून आधीच बढती दिली गेली. आता फौजदारांनाही कारवाई करण्याऐवजी बढती दिली जात आहे.