‘बोलावा विठ्ठल’ची सुरेल मेजवानी!

By admin | Published: July 11, 2017 01:01 AM2017-07-11T01:01:43+5:302017-07-11T01:01:43+5:30

‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’, ‘पदमनाभा नारायणा’, ‘संत भार पंढरीचा’ असा एकाहून एक अभंगांनी सजलेला स्वरमंच, अशा भक्तिमय वातावरणात रसिकांची ब्रह्मानंदी टाळी लागली.

Bolava Vitthal's Surl feast! | ‘बोलावा विठ्ठल’ची सुरेल मेजवानी!

‘बोलावा विठ्ठल’ची सुरेल मेजवानी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘राम कृष्ण हरी’च्या गजरातून भक्तिरसात न्हाऊन निघालेले रसिक... किशोरी आमोणकर, पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. भीमसेन जोशी यांच्या एकमेवाद्वितीय रचना सादर करीत गायकांनी वातावरणात भरलेले भक्तीचे रंग... ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’, ‘पदमनाभा नारायणा’, ‘संत भार पंढरीचा’ असा एकाहून एक अभंगांनी सजलेला स्वरमंच, अशा भक्तिमय वातावरणात रसिकांची ब्रह्मानंदी टाळी लागली.
निमित्त होते ‘पंचम निषाद क्रिएटिव्हस’ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि लोकमत समूह माध्यम प्रायोजक असलेल्या ‘बोलावा विठ्ठल..’ या कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या संगीतसंध्येचे. गेली १२ वर्षे पंचम निषादतर्फे आषाढी एकादशीचे औचित्य साधूून ‘बोलावा विठ्ठल’ अभंगमय संध्येचे आयोजन केले जात आहे. या मैफलीत सुप्रसिद्ध गायक रघुनंदन पणशीकर, पं. जयतीर्थ मेवुंडी, देवकी पंडित व आनंद भाटे यांनी अभंगसेवा सादर केली. या वर्षीचा कार्यक्रम गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांना समर्पित करण्यात आला होता.
महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पांडुरंगाचे निवासस्थान म्हणजे पंढरपूर. प्रतिवर्षी आषाढी एकादशीनिमित्त लाखो विठ्ठलभक्त वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. त्या वेळी ते विठ्ठलाच्या स्तुतीत अनेक अभंग गात असतात. ते सारे अभंग १२ ते १९ व्या शतकात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गोराकुंभार, संत जनाबाई यांनी रचलेले आहेत. ‘बोलावा विठ्ठल’ या संगीत मैैफलीमध्ये या अभंगांच्या आठवणींना उजाळा मिळाला.
रघुनंदन पणशीकर, आनंद भाटे आणि पं. जयतीर्थ मेवुंडी यांनी ‘जय जय राम कृष्ण हरी’मधून हरिनामाचा गजर करून संगीतसंध्येचा श्रीगणेशा केला. रघुनंदन पणशीकर यांनी ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’, ‘पद्मनाभा नारायणा’ या रचना सादर करत रसिकांना स्वरांमधून विठूरायाचे दर्शन घडवले. देवकी पंडित यांनी ‘मजवरी करी कृपा’, ‘संत भार पंढरीचा’ हे अभंग गाऊन वातावरण प्रफुल्लित केले. या रचनांना रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आनंद भाटे यांनी ‘जोहार माय बाप’, ‘अगा वैैकुंठीचा राया’ हे अभंग सादर केले. पं. जयतीर्थ मेवुंडी यांनी स्वरचित ‘सौैभाग्यदा लक्ष्मी बारम्मा’, ‘विठ्ठलैैया विठ्ठलैैया’ हे कानडी अभंग सादर केले. साई बँकर आणि भरत कामत (तबला), प्रकाश शेजवळ (पखवाज), महेंद्र शेडगे (तालवाद्य), एस.आकाश (बासरी), निरंजन लेले (हार्मोनियम) यांनी सुरेख साथसंगत केली.
>तरुण पिढीला संस्कृती-परंपरेच्या जवळ आणण्याचा प्रयत्न
पंचम निषाद संस्थेचे अध्यक्ष शशी व्यास म्हणाले, ‘मी काही वर्षांपूर्वी किशोरीतार्इंना भेटलो होतो. ज्याप्रमाणे संतवाणीला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळतो, त्याप्रमाणे अभंगवाणीला मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्या वेळी कार्यक्रमाचे ‘तोचि नादू सुखरू’ हे शीर्षक बदलून सोपे करण्याचे सुचवले. तुम्ही गायला तयार असाल तर मी हा कार्यक्रम करायला तयार आहे,’ असे मी म्हटल्यावर ‘बोलावा विठ्ठल’ या संगीत मैफलीची सुरुवात झाली. २००५ मध्ये पहिली मैफल रंगली.
या वेळी किशोरीतार्इंनी गायन केले’. या आठवणींना उजाळा देत, व्यास म्हणाले, ‘भारतीय भक्तिसंगीत हे सगुण-निर्गुण असे विभागलेले आहे. परंतु, अभंग प्रकार या दोहोंचा उत्कृष्ट संगम आहे. ‘बोलावा विठ्ठल’ हा एक असा प्रयत्न आहे, यामुळे तरुण पिढीला आपल्या संस्कृती व परंपरेच्या अधिक जवळ आणेल. शिवाय, महाराष्ट्रातील महान संत संत नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर आणि बहिणाबाई यांनी अभंगातून जो संदेश दिला आहे, तोही तरुणाईपर्यंत पोहोचेल.’

Web Title: Bolava Vitthal's Surl feast!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.