“शिवराय आमचे दैवत, पुतळ्याची घटना खूप वेदनादायी, राजकारणात...”: अभिनेता शरद केळकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 11:34 PM2024-09-01T23:34:36+5:302024-09-01T23:36:53+5:30
Actor Sharad Kelkar: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्व महाराष्ट्रीय व भारतीयांच्या मनात जी भावना आहे, तीच भावना माझ्याही मनात आहे, असे शरद केळकर याने म्हटले आहे.
Actor Sharad Kelkar: सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय नेते राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी करत आहेत. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी अनेक स्तरांतून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. यातच आता अभिनेता शरद केळकर याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
माजी खासदार नवनीत राणा आणि विद्यमान आमदार रवी राणा यांच्या वतीने दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बॉलिवूड अभिनेता शरद केळकर याने सहभाग घेतला. शरद केळकर याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शरद केळकर याला प्रतिक्रिया विचारण्यात आली.
शिवराय आमचे दैवत, पुतळ्याची घटना खूप वेदनादायी
शरद केळकर याने कार्यक्रमस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक करून शिवरायांच्या नावाचा जयघोष केला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्व महाराष्ट्रीय व भारतीयांच्या मनात जी भावना आहे, तीच भावना माझ्याही मनात आहे. शिवराय हे आमचे दैवत आहेत, आम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करतो, त्यांचा खूप आदर करतो. माझा सौभाग्य आहे की, मला त्यांच्या मूर्तीवर अभिषेक करण्याची संधी मिळाली. यासाठी मी अमरावती येथे या दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांचे आभार मानतो, असे शरद केळकर यांने नमूद केले.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी बोलताना, ही खूप वेदनादायी घटना आहे. ही घटना पाहून मला खूप दुःख झाले. मला या घटनेवर कोणत्याही प्रकारची राजकीय प्रतिक्रिया द्यायची नाही. कारण मी राजकारणात नाही, असे शरद केळकर याने स्पष्ट केले. शरद केळकर टीव्ही९ शी बोलत होता.