बॉम्बस्फोट किंवा आत्मघाती हल्ल्यांचा धोका
By admin | Published: October 25, 2014 08:30 AM2014-10-25T08:30:38+5:302014-10-25T08:32:44+5:30
एअर इंडियाचे विमान बॉम्बस्फोट वा आत्मघाती हल्ल्यात उडवून देण्याचा धोका गुप्तचर यंत्रणांनी उघड केल्याच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही विमानतळांवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सुरक्षा यंत्रणा सतर्क : मुंबई, अहमदाबाद, कोची विमानतळांवर रेडअलर्ट
मुंबई/अहमदाबाद/कोची : एअर इंडियाचे विमान बॉम्बस्फोट किंवा आत्मघाती हल्ल्यात उडवून देण्याचा धोका गुप्तचर यंत्रणांनी गोपनीय माहितीच्या आधारावर उघड केल्याच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही विमानतळांवर रेड अलर्ट जारी करीत चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुंबई- कोची तसेच अहमदाबाद-मुंबई या क्षेत्रात एअर इंडियाच्या विमानाला धोका असल्याची माहिती कोलकात्याहून मिळाली असल्याचे कोची येथील विमानतळ संचालक ए.के.सी नायर यांनी सांगितले. आत्मघाती बॉम्बर्स एअर इंडियाच्या दोन विमानांमध्ये चढण्याचा प्रयत्न करतील, असा इशारा नवी दिल्लीतील नागरी विमान वाहतूक सुरक्षा विभागाकडून एका पत्रात देण्यात आला.
२४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री किंवा २५ ऑक्टोबरच्या सकाळी अहमदाबादहून मुंबईला तसेच पहाटे ५ वाजता कोचीहून मुंबईला जाणार्या विमानांना लक्ष्य केले जाऊ शकते. प्रत्येक विमानात वेगवेगळा सुसाईड बॉम्बर असेल. त्यामुळे कसून चौकशी केल्यानंतर विमान उड्डाणांना परवानगी द्यावी, असे या पत्रात म्हटले होते. धोका लक्षात घेता या दोन तारखांना अहमदाबाद, मुंबई विमानतळांवरील सर्व विमानांची सुरक्षा वाढविली जाईल. अहमदाबादचे नागरी विमान वाहतूक प्रादेशिक उपायुक्तांनी २२ ऑक्टोबर रोजी या पत्राची प्रत संबंधित अधिकार्यांना दिली.
याआधीच विमानतळांभोवती चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रवाशांची कसून चौकशी करण्यासह विमानतळावरील प्रवेशाबाबतही चांगलीच छाननी होत आहे. अपहरणप्रतिबंधक पथकांनाही सतर्क करण्यात आले आहे. २४ ऑक्टोबर रोजी गुजरातमध्ये नववर्ष साजरे करण्यात आले तर २५ ऑक्टोबर रोजी भाऊबीज साजरी होत आहे.
आयसीस-अल-कायदाची हातमिळवणी
भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी आयसीस आणि अल-कायदा या दोन संघटनांनी हातमिळवणी केल्याची माहिती मिळाली आहे. गेल्याच महिन्यात अल-कायदाने भारतात शाखा उघडण्याची घोषणा केली. या संघटनेचा प्रमुख आयमन अल जवाहिरी याने व्हिडिओही जारी केला होता.
दिवाळीच्या आनंदावर विरजण
सुरक्षा यंत्रणतेतील जवान दिवाळी साजरी करण्याच्या मन:स्थितीत असतानाच हल्ल्यांबाबत सावधगिरीचा इशारा देण्यात आल्यामुळे मुंबई, अहमदाबाद, कोची विमानतळांवरील अधिकार्यांना धक्का बसला.सतर्कतेच्या इशार्यानंतर तिन्ही विमानतळांवरील संपूर्ण यंत्रणा सुरक्षा बंदोबस्ताला लागली.(लोकमत न्यूज नेटवर्क)