बम्बार्डियरची चाचणी यशस्वी
By admin | Published: January 15, 2015 05:28 AM2015-01-15T05:28:35+5:302015-01-15T05:28:35+5:30
उपनगरीय प्रवाशांच्या सेवेत लवकरच नव्याने येणाऱ्या बम्बार्डियर लोकलची अखेरची चाचणी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून बुधवारी घेण्यात आली.
मुंबई : उपनगरीय प्रवाशांच्या सेवेत लवकरच नव्याने येणाऱ्या बम्बार्डियर लोकलची अखेरची चाचणी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून बुधवारी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याचे रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी सांगितले. त्यामुळे ही लोकल धावण्यास कुठलीच अडचण नसल्याची माहितीही त्यांनी दिली. यावर रेल्वे बोर्डाकडून शिक्कामोर्तब होणे आवश्यक आहे.
एमआरव्हीसीमार्फत बम्बार्डियर कंपनीच्या ७२ लोकल मुंबईच्या उपनगरीय प्रवाशांसाठी येणार आहेत. या सर्व लोकलची बांधणी चेन्नईतील आयसीएफमध्ये (इंटिग्रल कोच फॅक्टरी) केली जात आहे. ७२ पैकी दोन लोकल २0१३ च्या आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात दाखल झाल्या. या दोन्ही लोकलची रेल्वे अधिकाऱ्यांकडून चाचणी घेण्यात आल्यानंतर पश्चिम रेल्वेवर २0१४ च्या मार्च, एप्रिल, मे, जुलै, सप्टेंबर, आॅक्टोबर, जानेवारी महिन्यात सुरू करण्यासाठी मुहूर्त निवडण्यात आले. मात्र काही तांत्रिक अडचणी येत असल्याने आणि रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून शेवटची चाचणी होणे बाकी असल्याने हे मुहूर्त पुढे ढकलण्यात आले. अखेर बुधवारी रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी चर्चगेट ते बोरीवली जलद आणि बोरीवली ते चर्चगेट धीम्या मार्गावर बम्बार्डियर लोकलची चाचणी घेतली. ही चाचणी घेतानाच लोकलचा वेग, प्लॅटफॉर्म आणि लोकलमधील गॅप आणि अन्य तांत्रिक चाचण्यांची माहितीही या वेळी घेण्यात आली. याबाबत बक्षी यांना विचारले असता, ही चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे बम्बार्डियर लोकल धावण्यास कुठलीच अडचण नाही. मात्र रेल्वे बोर्डाकडून काही मार्गदर्शक तत्त्वे येणे बाकी असून, तोपर्यंत या चाचणीचा अहवाल बनविला जाईल आणि तो नंतर रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. त्यांच्या मंजुरीनंतरच ही ट्रेन सुरू करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेवर अवलंबून असेल. (प्रतिनिधी)