Nitesh Rane : नितेश राणेंना मोठा दिलासा! 7 जानेवारीपर्यंत अटक न करण्याची राज्य सरकारची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 11:42 AM2022-01-04T11:42:55+5:302022-01-04T11:57:05+5:30
BJP Nitesh Rane : राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे दोन दिवसांचा अवधी मागून घेतला आहे. तसेच तोपर्यंत नितेश राणेंना अटक करण्यात येणार नसल्याची ग्वाही कोर्टाला दिली आहे.
मुंबई - संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे दोन दिवसांचा अवधी मागून घेतला आहे. तसेच तोपर्यंत नितेश राणेंना अटक करण्यात येणार नसल्याची ग्वाही न्यायालयाला दिली आहे. त्यामुळे नितेश यांना तूर्तास अटक होणार नसून आता त्यांच्या अटकपूर्व जामिनावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी सकाळी त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारने 7 जानेवारीपर्यंत नितेश राणे यांच्यावर अटकेसारखी कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, अशी ग्वाही न्यायालयात दिली. याप्रकरणाची पुढील सुनावणी सात जानेवारीला दुपारी 2.30 वाजता होईल. यावेळी पोलिसांकडून आपली बाजू मांडली जाईल. यापूर्वी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. अर्ज फेटाळून लावल्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज त्यावर कोर्टात सुनावणी झाली.
नितेश राणे यांचे वकील नितीन प्रधान यांनी त्यांची बाजू मांडली. तर सरकारी वकिलांनीही नितेश राणे हेच संतोष परब हल्ला प्रकरणातील सूत्रधार असल्याचं कोर्टाला सांगितलं. त्यामुळे शुक्रवारी दोन्ही बाजूचे वकील काय युक्तीवाद करतात आणि नितेश राणेंना जामीन मिळतो का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आणि शिवसैनिकाला मारहाण यासंदर्भात नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी होत आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापलेले आहे.
नेमकं काय आहे हे प्रकरण?
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर मुख्य आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. सचिन सातपुतेच्या अटकेनंतर आता शिवसेनेने भाजप आमदार नितेश राणे यांना अटक करावी, अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे पोलिसांनी तिसऱ्यांदा नितेश राणे यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, नितेश राणे एकदाही चौकशीला आले नाहीत. पोलीस नितेश राणे यांच्या घरीही गेले होते. मात्र, नितेश राणे तेथेही उपस्थित नव्हते.