बॉम्बे रुग्णालयात हिंसाचार करणारा तो मनोरुग्ण?
By admin | Published: May 15, 2014 02:44 AM2014-05-15T02:44:16+5:302014-05-15T02:44:16+5:30
बॉम्बे रुग्णालयातील रुग्णाचा जीव घेऊन दोघांना गंभीर जखमी करणारा शहाबुद्दीन तालुकदार (४२) मनोरुग्ण असावा, अशी माहिती आझाद मैदान पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबातून पुढे येते आहे.
मुंबई : बॉम्बे रुग्णालयातील एका रुग्णाचा जीव घेऊन अन्य दोघांना गंभीर जखमी करणारा शहाबुद्दीन तालुकदार (४२) मनोरुग्ण असावा, असा संकेत देणारी माहिती आझाद मैदान पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबातून पुढे येते आहे. बॉम्बे हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये क्षयरोग आणि अन्य दुर्धर रोगावरील उपचारांसाठी दाखल असलेल्या तालुकदारने १२ मे रोजी लीलाबिहारी गोवर्धन ठाकूर या वृद्ध रुग्णासह अन्य दोघांवर जीवघेणा हल्ला केला. त्यात ठाकूर ठार झाले, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. मात्र, हा हल्ला होण्याआधी तालुकदारने सोबत असलेल्या मेहुण्याला शिवीगाळ केली होती. तसेच त्याला मारहाणही केली होती. इतकेच नव्हे तर वॉर्डमधील एका नर्सलाही धक्काबुक्की केली होती. हा प्रकार पाहून मध्ये पडलेल्या दोन वॉर्डबॉयनी तालुकदारच्या मुसक्या आवळल्या. मात्र, तालुकदारने सुटकेसाठी त्यापैकी एकाचा चावा घेण्यासाठी धडपड केली. त्याला जडलेल्या रोगाचा संसर्ग आपल्यालाही होईल, या भीतीने वॉर्डबॉयची पकड ढिली पडली. आदल्या दिवशी संध्याकाळी तालुकदार भिंतीवर डोके आपटताना पाहिला होता. भिंतीवर डोके आपटून घेताना तो जडलेल्या रोगांना दूषणे देत होता, अशी माहिती पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबांमधून पुढे आल्याचे समजते. जनरल वॉर्डमध्ये दाखल असलेले अन्य रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी तालुकदारचे विचित्र वागणे अनुभवले होते. ८ मे रोजी त्याला या वॉर्डात दाखल करून घेण्यात आले. तेव्हापासून त्याचे विचित्र वागणे सुरू होते. तो आपल्या पत्नी आणि मेहुण्याला अधूनमधून शिवीगाळ करे. मोठ्याने ओरडे. खाटेवरून खाली उतरे. कधी अंगात आल्यासारखे वागे. कधी स्वत:चेच केस ओढून मोठमोठ्याने ओरडे़ हे प्रकार अनुभवल्याचे अन्य रुग्ण सांगतात. हे हत्याकांड घडल्यानंतर तालुकदारला जे़ जे़ रुग्णालयातील मानसोपचार विभागात हलवण्यात आले आहे. तेथे त्याला जडलेल्या रोगांवर उपचार सुरू आहेत. तसेच त्याची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी विविध चाचण्या सुरू आहेत. जे़ जे़ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले, तालुकदारवर एमआरआय चाचणी केली जाणार आहे. त्यांच्या माहितीनुसार तालुकदार २००६ ते २००८ या काळात मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचार घेत होता. दरम्यान, जे़ जे़ रुग्णालयाकडून अहवाल आल्यानंतर आझाद मैदान पोलीस तालुकदारच्या अटकेबाबत निर्णय घेणार आहेत. (प्रतिनिधी)