जीवनदानासाठी धावते ‘बॉम्बे ओ’ एक्स्प्रेस

By admin | Published: April 9, 2017 12:15 AM2017-04-09T00:15:00+5:302017-04-09T00:15:00+5:30

एका रक्तदात्याची कथा : तासगावच्या विक्रम यादव यांनी वाचविले ४२ जणांचे प्राण

Bombay O 'Express runs for life | जीवनदानासाठी धावते ‘बॉम्बे ओ’ एक्स्प्रेस

जीवनदानासाठी धावते ‘बॉम्बे ओ’ एक्स्प्रेस

Next

अविनाश कोळी -- सांगली--माणुसकीची आणि मदतीची भावना एखाद्याच्या रक्तातच असावी लागते, असे म्हणतात. दुर्मिळ रक्तगटाचा एक दाता स्वत:च्या जिवापेक्षाही दुसऱ्याच्या जिवाचा विचार करत दररोज अंगातील रक्तासारखाच धावतो आहे. अत्यंत दुर्मिळ असलेल्या रक्तगटाचे रक्त देऊन त्याने तब्बल ४२ जणांचे प्राण वाचविले आहेत.
जीवनाच्या रुळावर प्राणपणाने धावणाऱ्या या एक्स्प्रेसचे नाव आहे विक्रम यादव. तासगाव (जि. सांगली) येथील बेताचीच परिस्थिती असलेल्या कुटुंबातील हा कर्ता पुरुष. भिलवडी स्टेशनवरील चितळे डेअरीमध्ये वाहनचालक म्हणून काम करणाऱ्या विक्रम यादवने पदरमोड करून लोकांना जीवनदान दिले आहे. यामुळे अनेकदा घरातील आर्थिक परिस्थिती आणखी बिकट बनली, तरीही जीवनदान मिळालेल्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून यादवांचे कुटुंब मनाने श्रीमंत बनले आहे.
दोनच दिवसांपूर्वी यादव यांनी स्वत:च्या जिवाची परीक्षा घेत रत्नागिरीतील एका बाळ-बाळंतिणीला वाचविले. करबुडे गावात चिरेखाणीवर काम करणाऱ्या व जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी २ एप्रिलला दाखल झालेल्या अंजली सचिन हेळकर (रा. मूळ सोलापूर) या महिलेच्या रक्तात हिमोग्लोबिन अत्यंत कमी आढळले. त्यांच्यात अत्यंत दुर्मिळ असा ‘बॉम्बे ओ’ रक्तगट आढळून आला. या गटाचे रक्तच उपलब्ध नसल्याने दात्यापर्यंत पोहोचायचे कसे, असा प्रश्न होता. मात्र, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. डी. आरसूळकर यांनी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून रक्तदात्यांना आवाहन केले.
या आवाहनाला सर्वात पहिला प्रतिसाद तासगावच्या विक्रम यादव यांनी दिला. ३ एप्रिलरोजी सायंकाळी कामावरून परतल्यानंतर त्यांनी रत्नागिरीला जाणाऱ्या बसची चौकशी केली. पण रात्री एकही बस नसल्याचे त्यांना कळाले. मग त्यांनी मोटारसायकलवरून जाण्याचा निर्णय घेतला. आजवर मुलाच्या मागे डोंगरासारखे उभे राहणाऱ्या यादव यांच्या आई-वडिलांनी त्यांना सांगितले की, दुचाकी मिळाली नाही, तर सायकलने जा, पण त्या बाळंतिणीचा जीव वाचला पाहिजे. आई-वडिलांच्या या ताकदीने त्यांनी रात्रीच मित्रासोबत रत्नागिरीकडे मार्गक्रमण केले. मध्यरात्री दोन वाजता ते तेथे पोहोचले. सकाळी त्यांनी तेथे रक्तदान केले. अंजली यांना मुलगा झाला. मात्र हेळकर दाम्पत्याला सर्वाधिक कौतुक जन्माला आलेल्या बाळापेक्षा, जिवासाठी धावणाऱ्या या दात्याचे वाटले.
आजवर ४२ जणांना दुर्मिळ रक्ताचे दान करतानाच विक्रम यादव यांनी महाराष्ट्र व अन्य राज्यांतील या गटातील लोकांचा गट स्थापन केला आहे. रत्नागिरी, नांदेड, नाशिक, मुंबई या जिल्ह्यासह अगदी मलेशिया, कोलंबिया अशा परदेशातील रुग्णांनाही त्यांनी हा रक्तगट पोहोचवून, मदतीचा हात दिला आहे.


म्हणून धावतात विक्रम...
ही घटना आहे १९९५ मधील. एका अपघातात विक्रम यादव यांचा जवळचा मित्र जीवन-मरणाच्या कुंपणावर अडकला होता. त्याचा रक्तगटही ‘बॉम्बे ओ’ होता. मात्र त्यावेळी त्यांना त्यांच्या रक्तगटाची कल्पना नव्हती. रक्ताअभावी या मित्राचा मृत्यू झाला. त्यानंतर काही महिन्यांनी आणखी एका मित्राच्या आईला रक्त देण्यासाठी विक्रम मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यावेळी तेथील डॉक्टरनी विक्रम यांचा रक्तगट ‘बॉम्बे ओ’ असल्याचे सांगितले आणि त्यांचे डोळे पाणावले. काही दिवसांपूर्वी ही गोष्ट कळाली असती, तर मित्राचे प्राण वाचले असते, याची जाणीव त्यांना झाली. हे शल्य आजही त्यांना बोचते आहे. या मित्राला आदरांजली म्हणून विक्रम दुसऱ्याच्या जिवासाठी आता सतत धावत असतात. प्रत्येक जीव वाचल्यानंतर ते त्या मित्राला आदरांजली अर्पण करतात.



माणुसकीची आणि मदतीची भावना एखाद्याच्या रक्तातच असावी लागते, असे म्हणतात. दुर्मिळ रक्तगटाचा एक दाता स्वत:च्या जिवापेक्षाही दुसऱ्याच्या जिवाचा विचार करत दररोज अंगातील रक्तासारखाच धावतो आहे. अत्यंत दुर्मिळ असलेल्या रक्तगटाचे रक्त देऊन त्याने तब्बल ४२ जणांचे प्राण वाचविले आहेत.

विक्रम यांनी रत्नागिरी, नांदेड, नाशिक, मुंबई या जिल्ह्यांसह मलेशिया, कोलंबिया अशा परदेशी रुग्णांनाही हे रक्त पोहोचवून, मदत केली आहे.


सोशल ग्रुप
‘बॉम्बे ओ’ हा रक्तगट असलेल्या लोकांचा व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप बनवून यादव यांनी दुर्मिळ सेतू तयार केला आहे. २३० लोक या ग्रुपमध्ये आहेत. महाराष्ट्रातील ६० ते ६५ जणांचा त्यात समावेश आहे.


काय आहे ‘बॉम्बे ओ’?
बॉम्बे ब्लड ग्रुपला ‘ओएच’ म्हणूनही ओळखले जाते. या रक्तगटाचा शोध १९५२ मध्ये वाय. एम. भेंडे नावाच्या डॉक्टरांनी पूर्वीच्या मुंबईमध्ये अर्थात बॉम्बेमध्ये लावला, म्हणून त्याला बॉम्बे हे नाव पडले. आपण सर्वजण असे समजतो की, ‘ओ निगेटिव्ह’ हा रक्तगट सर्वात दुर्मिळ असतो. कारण तो फारच कमी लोकांमध्ये आढळतो. पण, ‘ओ निगेटिव्ह’पेक्षाही ‘बॉम्बे ब्लड’ ग्रुप दुर्मिळ रक्तगट मानला जातो. हा रक्तगट जगाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ ०.०००४ टक्के लोकांमध्येच आढळतो. दर दहा लाख लोकांच्या मागे केवळ चारजण या रक्तगटाचे सापडतात. इतका हा दुर्मिळ आहे. या प्रकारच्या रक्तगटामध्ये असणारा ‘अँटीजन एच’ हा घटक, याच्या दुर्मिळ असण्याचे महत्त्वाचे कारण आहे. हा घटक अन्य कोणत्याही रक्तगटात आढळत नाही.

Web Title: Bombay O 'Express runs for life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.