बोगस बीटी बियाणे जप्त

By Admin | Published: June 11, 2014 01:22 AM2014-06-11T01:22:05+5:302014-06-11T01:22:05+5:30

अहमदाबादमधील एका बियाणे कंपनीच्या अधिकाऱ्याच्या येथील घरावर धाड घालून कृषी खात्याच्या भरारी पथकाने साडेतीन लाख रुपये किमतीचे बोगस बीटी बियाणे जप्त केले.

Bombs seized Bt seeds | बोगस बीटी बियाणे जप्त

बोगस बीटी बियाणे जप्त

googlenewsNext

अमरावतीचे भरारी पथक : बियाणे कंपनीतील अधिकाऱ्याच्या घरावर धाड
यवतमाळ : अहमदाबादमधील एका बियाणे कंपनीच्या अधिकाऱ्याच्या येथील घरावर धाड घालून कृषी खात्याच्या भरारी पथकाने साडेतीन लाख रुपये किमतीचे बोगस बीटी बियाणे जप्त केले.
संजय पंढरीनाथ परडखे रा. चांदोरेनगर धामणगाव रोड यवतमाळ असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्यावर यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे यांच्या मार्गदर्शनात विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी जी.टी. देशमुख यांच्या पथकाने आज सकाळी ८ वाजता पोलिसांच्या मदतीने परडखे यांच्या घरी धाड घातली. त्यांच्या घरातून बोगस बीटी बियाण्याचे ३७१ पाकीट जप्त करण्यात आले. त्यात काही लिगल बीटीची पॉकीटेही आढळून आली. मात्र विक्री परवाना नसताना घरात साठेबाजी केल्यावरून ती जप्त केली गेली. या पथकात पुरुषोत्तम कडू, मनोहर पाटेकर, संजय देशमुख हे कृषी अधिकारी तर यादव हांडे, दिलीप अडकिने, आशाताई गोल्हर या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सर्वच तालुक्यात बोगस बीटी बियाण्यांची विक्री सुरू आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. तणनाशक फवारल्यास हे बियाणे व पऱ्हाटी जळणार नाही, असा दावा करून या बियाणे विक्रेत्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल चालविली आहे. त्यात काही बियाणे कंपन्यांचे कर्मचारी आणि कृषी केंद्रही सहभागी असल्याचा संशय विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी जी.टी. देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र आणि अमरावती जिल्ह्यात मोर्शी, वरुड, धामणगाव रेल्वे या तालुक्यांमध्ये बोगस बीटीची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. परडखे यांच्या घरावर दोन दिवसांपासून भरारी पथकाचा वॉच होता. घरात बोगस बियाणे असल्याची खात्री पटल्यानंतर पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनात पोलिसांच्या मदतीने धाड घातली गेली. परडखे हे एक्सीस सीडस् अ‍ॅन्ड क्रॉप टेक्नॉलॉजी अहमदाबाद या कंपनीत नोकरीला आहेत.
भरारी पथकाचा सर्वच तालुक्यांवर वॉच असून आणखी धाडी घातल्या जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. विशेष असे याच भरारी पथकाने दोन दिवसापूर्वी पुसद येथे धाड घालून ७२ लाख रुपयांचे बोगस बीटी बियाणे जप्त केले होते. यातील आरोपी चंदूलाल राठोड याला जामीन मिळू नये म्हणून कृषी विभाग प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Bombs seized Bt seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.