गर्भनिरोधक गोळ्यांची बिनधास्त विक्री
By admin | Published: May 20, 2016 02:25 AM2016-05-20T02:25:13+5:302016-05-20T02:25:13+5:30
औषध दुकानाच्या काउंटरवर बिनधास्तपणे गर्भनिरोधक औषध, गोळ्या घेण्यास येणाऱ्या तरुणी दिसून येऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त होऊ लागले
संजय माने,
पिंपरी-पान टपरीवर सिगारेट शिलगावणाऱ्या, कधी हुक्का फ्लेवर घेण्यासाठी थांबणाऱ्या युवती हे दृश्य नेहमीचे झाल्याने त्यातील कुतूहल उरले नाही. अलीकडच्या काळात औषध दुकानाच्या काउंटरवर बिनधास्तपणे गर्भनिरोधक औषध, गोळ्या घेण्यास येणाऱ्या तरुणी दिसून येऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे. मोठ्या औषध दुकानांतून रोज किमान चार ते पाच तर छोट्या दुकानांमधून किमान दोन अशा प्रमाणात गर्भनिरोधक गोळ्यांची विक्री होत आहे. गर्भनिरोधक गोळ्या खरेदी करणाऱ्यांमध्ये १७ ते ३२ वयोगटातील अविवाहित युवती, महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे प्रमाण अधिक असल्याने याबद्दल चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
गर्भपात करण्याची वेळ येऊ नये, याची दक्षता म्हणून बाजारात मिळणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांचा पर्याय तरुणींनी स्वीकारला आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा प्रकारे औषध-गोळ्या घेणे धोकादायक ठरू शकते, हे माहिती असूनही अनेक युवती औषध दुकानातून आणलेल्या गर्भनिरोधक गोळ्या घेऊन वेळ मारून नेत आहेत. लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने कुटुंब नियोजनाकरिता औषध दुकानांमध्ये उपलब्ध करून दिलेली गर्भनिरोधक साधने, गोळ्यांचा वापर दुसऱ्याच कारणासाठी केला जात आहे.
तरुण-तरुणींमधील प्रेमसंबंधाचे रूपांतर पुढे शारीरिक आकर्षणात होते. विवाहापूर्वी काही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता म्हणून गर्भनिरोधक गोळ्या खाण्याकडे तरुणींचा कल दिसून येतो. अशा प्रकारे गोळ्या खाणे शारीरिकदृष्ट्या दुष्परिणाम करणारे ठरणारे असले, तरी झालेल्या चुकीवर उपाय म्हणून अशा गोळ्या खाण्याची जोखीम पत्करणाऱ्या तरुणींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
औषध दुकानांमध्ये सहज मिळणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांचा एक प्रकारे गैरवापर होत आहे.
औषध दुकानांमधून विक्री होणाऱ्या गोळ्या, औषधांची नोंद होत नाही. किशोरवयीन मुलीसुद्धा स्वत: दुकानाच्या काउंटरवरून गर्भनिरोधक गोळ्या घेऊन जाताना दिसून येतात. हिंजवडी आयटी परिसर, तसेच औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण-तरुणींचे प्रमाण अधिक आहे.
हिंजवडी, वाकड, पिंपळे गुरव, काळेवाडी, तसेच भोसरी, पिंपरी परिसरातील औषध दुकानांमधून गर्भनिरोधक गोळ्या विक्रीचे प्रमाण अधिक असल्याचे औषध दुकानदार सांगतात.