राज्यात प्रथमच हाडांचे दान, तीन रुग्णांना दिलासा
By admin | Published: February 21, 2016 02:01 AM2016-02-21T02:01:56+5:302016-02-21T02:01:56+5:30
मृत्यूनंतर अवयवदानाचा विचार आता नव्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. चेंबूर येथे मृत्यू झालेल्या ६४ वर्षीय व्यक्तीच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेऊन तीन
मुंबई : मृत्यूनंतर अवयवदानाचा विचार आता नव्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. चेंबूर येथे मृत्यू झालेल्या ६४ वर्षीय व्यक्तीच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेऊन तीन रुग्णांची मदत केली. यामध्ये हाडांच्या दानाचाही समावेश असून, कर्करुग्णांना उपचारासाठी सहाय्यदेखील केले. अशा प्रकारे राज्यात पहिल्यांदाच हाडांचे दान करण्यात आले आहे.
चेंबूर येथे राहणाऱ्या ६४ वर्षीय पुरुषास ११ फेब्रुवारी रोजी छातीत दुखायला लागल्यामुळे सावला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा ईसीजी काढण्यात आला. त्या वेळी त्यांच्या हृदयात ब्लॉकेज असल्याचे आढळून आले. त्यामुळे रक्त पातळ करण्यासाठी त्यांना इंजेक्शन देण्यात आले. त्याच रात्री त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे ते कोमात गेले आणि हळूहळू मेंदूचे कार्य कमी झाले. १९ फेब्रुवारी रोजी डॉक्टरांनी रुग्ण ब्रेनडेड झाल्याची माहिती दिली. त्या वेळी त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे त्यांचे जावई उत्तम आंबोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
उत्तम यांनी सांगितले, ‘रुग्णाची स्थिती सुधारू शकत नाही. कारण मेंदू कार्यरत नाही, असे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले. वर्तमानपत्रात अवयवदानाविषयी वाचले होते. त्यामुळे सासरे अवयवरूपाने जिवंत राहावेत, म्हणून आम्ही सर्वांनी मिळून अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानंतर रुग्णालयाने सायन आणि केईएम रुग्णालयाशी संपर्क साधला. १९ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता सायन रुग्णालयाचे डॉक्टर येऊन सासऱ्यांना सायन रुग्णालयात घेऊन गेले. सर्व तपासण्या झाल्या. त्यानंतर डॉक्टरांनी यकृत, मूत्रपिंड, डोळे घेण्याचा निर्णय घेतला. आम्ही डॉक्टरांना अजून कोणता अवयव दुसऱ्यांना उपयुक्त असल्यास काढून घ्या, असे सांगितले. त्यांनी हाडेदेखील उपयुक्त असल्याचे सांगितले. त्यालाही आम्ही मंजुरी दिली.’
कर्करुग्णांच्या उपचारासाठी हाडे उपयुक्त असतात, पण या आधी गुडघ्यांची शस्त्रक्रिया झाल्यावर अथवा अशी अन्य कोणती शस्त्रक्रिया झाल्यावर काढलेली हाडे उपचारासाठी वापरली जातात.
हाडांचा कर्करुग्णांना
कसा होतो उपयोग?
काही कर्करोग रुग्णांसाठी हाडाच्या चुऱ्याचा उपयोग केला जातो. हाडांची पावडर केली जाते. ही पावडर कर्करुग्णांना उपचारासाठी वापरली जाते. आत्तापर्यंत जिवंत व्यक्तींच्या हाडांचा उपयोग केला जातो. उदा. गुडघा प्रत्यारोपण अथवा तत्सम शस्त्रक्रियांमधून मिळणाऱ्या हाडांचा उपयोग केला जातो, असे प्रत्यारोपण समन्वय समितीकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
तिघांना दिलासा
या रुग्णाने दान केलेले यकृत ज्युपिटर रुग्णालयातील ६५ वर्षीय महिलेला देण्यात आले. एक मूत्रपिंड सायन रुग्णालयात तर दुसरे जसलोक रुग्णालयातील रुग्णांना देण्यात आले. यामुळे २६ वर्षीय मुलाला व ३५ वर्षीय पुरुषास जीवनदान मिळाले.