बाजोरियांच्या मंत्रिपदासाठी मुंबईत लॉबिंग!
By admin | Published: April 6, 2017 12:25 AM2017-04-06T00:25:51+5:302017-04-06T00:25:51+5:30
अकोला- पश्चिम विदर्भातील शिवसेनेचे ज्येष्ठ विधान परिषद आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या वाटेला कॅबिनेट मंत्रिपद यावे, यासाठी मुंबईत लॉबिंग सुरू झाली आहे
पश्चिम विदर्भातील शिवसेना जिल्हाप्रमुख मुंबईकडे रवाना
अकोला : शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री कामे करीत नसल्याच्या तक्रारींचा ओघ वाढत असल्याचे पाहून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोठे फेरबदल करणार असल्याचे संकेत आहेत. त्या पृष्ठभूमीवर पश्चिम विदर्भातील शिवसेनेचे ज्येष्ठ विधान परिषद आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या वाटेला कॅबिनेट मंत्रिपद यावे, यासाठी मुंबईत लॉबिंग सुरू झाली आहे. त्याकरिता अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातून सेनेचे जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी बुधवारी मुंबईकडे रवाना झाले आहेत.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका, जिल्हा परिषद तसेच नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची पीछेहाट झाल्याचे चित्र समोर आले. दहा महापालिकांपैकी शिवसेनेला मुंबई आणि ठाणे या दोन मनपात तारेवरची कसरत करून सत्ता राखता आली. निवडणुकीच्या कालावधीत त्या-त्या भागात एकही मंत्री फिरकला नाही. याशिवाय ज्या आमदारांची कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लागली, ते मंत्री पक्षातील आमदारांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची कामे करीत नसल्याच्या पक्षाकडे तक्रारी वाढल्या. हातात सत्ता असूनही कामे होत नसल्याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होण्याची दाट शक्यता लक्षात घेता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्र्यांची उचलबांगडी करण्याचे संकेत दिले आहेत. पश्चिम विदर्भातील विधान परिषदेचे ज्येष्ठ आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या वाटेला कॅबिनेट मंत्रिपद यावे, यासाठी मुंबईत हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. बुधवारी रात्री शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, श्रीरंग पिंजरकर, उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ ढोरे, रवींद्र पोहरे, दिलीप बोचे, निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवनिकर, संतोष अनासने, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे. त्यापाठोपाठ बुलडाणा तसेच वाशिम येथील सेनेचे जिल्हाप्रमुख, नगराध्यक्ष अशोक हेडाही रवाना झाले आहेत.
पश्चिम विदर्भाची झोळी रिकामी!
कधीकाळी पूर्व आणि पश्चिम विदर्भातून शिवसेनेचे आमदार निवडून यायचे. आज रोजी यवतमाळचे एकमेव राज्यमंत्री संजय राठोड वगळता मंत्रिपदासाठी पश्चिम विदर्भाची झोळी रिकामी असल्याचे दिसून येते.
प्रश्न निकाली काढणारा आमदार!
अधिवेशन काळात अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे विविध प्रश्न, समस्या निकाली काढणारा आमदार अशी बाजोरियांची ओळख आहे. या बाबीचा बाजोरियांना फायदा मिळतो का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.