नववीचे इतिहासाचे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात
By admin | Published: July 4, 2017 04:59 AM2017-07-04T04:59:52+5:302017-07-04T04:59:52+5:30
भारताचे माजी पंतप्रधान आणि संगणकपर्वाचे प्रणेते राजीव गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह उल्लेख असल्याने इयत्ता नववीचे ‘इतिहास व राज्यशास्त्र’ हे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारताचे माजी पंतप्रधान आणि संगणकपर्वाचे प्रणेते राजीव गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह उल्लेख असल्याने इयत्ता नववीचे ‘इतिहास व राज्यशास्त्र’ हे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या गोष्टीचा तीव्र निषेध करून हा चुकीचा इतिहास तातडीने बदलावा, अशी मागणी पुणे शहर काँग्रेसने केली आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून नववीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला असून, नवी पुस्तके नुकतीच बाजारात आली आहेत. इतिहासाच्या पुस्तकातील एका धड्यात राजीव गांधींबद्दल आक्षेपार्ह सोयीचे लिखाण करण्यात आले आहे.
‘‘माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत बोफोर्स कंपनीकडून घेण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या तोफ खरेदीसंदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजीव गांधी यांच्यावर बरीच टीका झाली. राजकीय भ्रष्टाचार हा या काळातील निवडणुकांचा एक महत्त्वाचा मुद्दा बनला आणि सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला.’’ असे या पुस्तकात म्हटले आहे. मात्र, बोफोर्स तोफ खरेदी प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधी निर्दोष असल्याचा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाची माहितीही या पुस्तकात देण्यात आलेली नाही.
पुस्तकामध्ये १९९१नंतरचे बदल, या परिच्छेदामध्ये माजी पंतप्रधान दिवंगत नरसिंह राव यांचे छायाचित्र छापण्यात आलेले नाही. राव यांच्या १९९१ ते १९९५ या कारकिर्दीत रामजन्मभूमी व बाबरी मशिदीचा प्रश्न ऐरणीवर आला, असे म्हटले आहे.
मात्र बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी भाजपाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, माजी मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या त्यांच्यावर लखनऊच्या न्यायालयात खटला सुरू आहे, याचा उल्लेख टाळण्यात आला आहे.
या गोष्टींवर आक्षेप नोंदवत विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असून, चुकीचा इतिहास लिहिणे कदापि सहन करणार नाही, असा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिला आहे. याबाबत शिक्षण आयुक्तांना निवेदनही देण्यात आले आहे.
विषय समितीपुढे मांडू
नववीच्या इतिहास पुस्तकातील काही लिखाणाबद्दल घेण्यात आलेला आक्षेप संबंधित विषय समितीपुढे मांडला जाणार आहे. त्याबाबत विषय समितीकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल. अभ्यासक्रमामध्ये बदल करण्याचे सर्वस्वी अधिकार या विषय समितीला आहेत.
- सुनील मगर, संचालक,
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ