टोपलीत दप्तर अन् हातात अभ्यासाचं पुस्तक
By admin | Published: January 7, 2016 10:46 PM2016-01-07T22:46:06+5:302016-01-08T01:13:15+5:30
प्रगती जाधव-पाटील ल्ल सातारा शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी अभ्यासिका : आज उद्घाटन; सातारा बाजार समितीचा राज्यात पहिलाच आदर्शवत उपक्रम - गूड न्यूज
सातारा : ‘शेतकऱ्यांच्या पोरांनी पदवी घ्यावी अन् नोकरीसाठी मुंबई गाठावी, तर पोरींनी कॉलेजचं तोंड बघावं अन् दिल्या घरी सुखी रहावं’, अशी अघोषित परंपरा खंडित करण्याचे पाऊल सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीने उचलले आहे. खास शेतकऱ्यांच्या मुलांसाठी अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज अशी मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे.
मुक्कामी एसटीनं सातारा गाठायचा... कॉलेजच्या आधी टोपल्यातली भाजी विकायची आणि मग धावत पळत कॉलेज गाठायचं. कॉलेज संपलं की बाजार समितीच्या आवारात ठेवलेल्या टोपल्या उचलायच्या आणि स्टॅण्ड गाठायचं. एसटी येईतोवर टोपलीत दप्तर ठेवून हातात पुस्तक घेऊन अभ्यास करायचा. विश्वास बसणार नाही कदाचित; पण काही शेतकऱ्यांच्या मुलांचा हा दिनक्रम आजही आहे.
सातारा तालुक्यातील काही दुर्गम भागात अजूनही सकाळच्या मुक्कामी गाडीनंतर थेट तीन-चारचीच एसटी! तोपर्यंत शहरात गेलेल्या लेकरांनी स्टॅण्ड किंवा कॉलेजच्या परिसराचा आसरा घेऊन तिथेच थांबून रहायचे! शेतकऱ्यांच्या मुलांची ही परवड लक्षात घेऊन सातारा बाजार समितीने या मुलांना सुरक्षित आश्रय देण्याचा संकल्प केला.
बाजार समितीच्या अखत्यारीतील जागा स्वच्छ करून डागडुजी करून घेतली. त्यानंतर येथे स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. समाजातील काही माहीतगारांनी
यात मदत केली आणि अवघ्या
काही दिवसांत अद्यावत
अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी सज्ज झाली.
आधुनिक तंत्रज्ञान हाताळता येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना ‘किंडली’टॅबद्वारे अभ्यास करता येणे शक्य आहे. बाजार समितीत वाय फाय असल्यामुळे हा टॅब वापरणे सोपे होणार आहे. या किंडली सॉफ्टवेअरमध्ये ३०० पुस्तकांतील अभ्यास लोड करण्यात आला
आहे.
याद्वारे विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे. सुमारे दोनशेहून अधिक पुस्तके, संगणक, तीस लाख पुस्तकांची डिजिटल लायब्ररी आणि टॅब यांनी सज्ज असलेली ही बहुदा पहिली अभ्यासिका ठरणार आहे. सकाळी दहा ते संध्याकाळी ६ पर्यंत ही अभ्यासिका सुरू राहणार आहे.
सीसीटीव्ही अन् हायफाय यंत्रणा !
बाजार समिती इमारतीच्या पार्किंगच्या जागेत सुरू करण्यात आलेल्या या अभ्यासिकेमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. याचे चित्रण थेट सभापती यांच्या दालनात आणि त्यांच्या मोबाईलमध्ये दिसणार आहे. अभ्यासाव्यतिरिक्त येथे कोणी दंगा मस्ती करत असले तर त्याची तातडीने माहिती याद्वारे बाजार समितीला मिळणार आहे. गैरवर्तन करताना आढळणाऱ्या विद्यार्थ्यांवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करून त्याचे सदस्यत्व कायमचे रद्द करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे चेअरमन अॅड. विक्रम पवार यांनी दिली.
उद्घाटनाआधीच शतकीय खेळी
सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने फक्त शेतकऱ्यांच्याच मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या अभ्यासिकेचा नावनोंदणीचा फलक दोन दिवसांपासून बाजार समितीच्या आवारात लावण्यात आला होता. केवळ या फलकावरील जाहिरात पाहून दोन दिवसांत तब्बल ११० मुलांनी यात आपले नाव नोंदविले आहे. यात ४० मुलींचा समावेश आहे. या अभ्यासिकेचे उद्घाटन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते दि. ८ जानेवारीला सकाळी ११ वाजता होणार आहे.
सातारा तालुक्यातील नरेवाडी, परमाळे या गावांत सकाळी सहा आणि दुपारी चार वाजता अशा दोनच एसटी बस असतात. साताऱ्यात शेतीमालाची विक्री करून कॉलेज करणारी अनेक मुलं स्टॅण्डच्या गोंगाटात अभ्यास करत होती. या अभ्यासिकेच्या निमित्ताने त्यांना शांत आणि हक्काची जागा मिळणार आहे. भविष्यात भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या निवासाची सोयही बाजार समिती करणार आहे.
- अॅड. विक्रम पवार, चेअरमन, सातारा बाजार समिती