बडी बेचैन रहती हैं किताबें...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2016 12:52 AM2016-01-17T00:52:02+5:302016-01-17T00:52:02+5:30
‘किताबे झाकती है, बंद अलमारी की शिशोंसे, भरी हसरत से ताकती है, महिनों अब मुलाकाते नही होती’,
- मंगेश पांडे/प्रज्ञा केळकर-सिंग ल्ल ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी) :
‘किताबे झाकती है,
बंद अलमारी की शिशोंसे,
भरी हसरत से ताकती है,
महिनों अब मुलाकाते नही होती’,
‘बडी बेचैन रहती है किताबे,
इन्हे अब नींद मे चलने की आदत हो गई है’, अशी ‘नज्म’ पेश करीत ज्येष्ठ साहित्यिक आणि गीतकार गुलजार यांनी रसिकांची सायंकाळ ‘कवितामय’ केली.
पिंपरी चिंचवड येथील ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विविध नज्मे अदाकारीने पेश कर गुलजार यांनी मंत्रमुग्ध केले. अंबरीश मिश्र यांनी गुलजार यांना बोलते केले आणि या गप्पांमधून त्यांचा प्रवास उलगडला. गुलजार यांनी गप्पांच्या ओघात कवी आणि कविता यांच्यातील नात्याविषयी भूमिका मांडली.
कवितेचा जन्म अनाहूत असतो, ती मनातील भावनांचे मूर्त स्वरुप असते, असे सांगत गुलजार म्हणाले, विस्तवावर ठेवलेल्या पातेल्यात उकळणारे पाणी वाफेच्या रुपात बाहेर पडते आणि पातेल्यावरील झाकण तडतडते. कवीमनाची स्थितीही अशीच असते. मनातील भावना कवितेच्या रुपात वाफा बनून बाहेर पडतात. या भावना व्यक्त होत नाहीत तोवर मनाला स्वस्थता मिळत नाही, असे सुरेख वर्णन त्यांनी केले.
तंत्रज्ञानाच्या जमान्यात आजकाल कविताही एका क्लिकवर जन्म घेतात. पूर्वी पुस्तकांना अंगाखांद्यावर खेळवले जायचे., पुस्तकांतील चिठ्ठी, कोमजलेली फुले अनेक आठवणी जागवायची. पुस्तके उचलण्याच्या बहाण्याने नात्यांचे नाजूक बंध गुंफले जायचे. ‘अब वो जमाना नही रहा’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
इतक्या वर्षाच्या प्रवासात आजही आपण पूर्ण कवी झाल्याचे वाटत नसल्याचे त्यांनी प्रांजळपणे नमूद करत सर्वांची मने जिंकली. कुसुमाग्रज, कवी ग्रेस यांच्या अनुवादित केलेल्या काही कविताही त्यांनी पेश केल्या. अनुवाद तंतोतंत असेल तर तो सुंदर नसतो आणि सुंदर असेल तर तो तंतोतंत नसतो, असे सुरेख गणित त्यांनी यावेळी उलगडले.
सिनेमांसाठी गीत करताना कवींना स्वातंत्र्य मिळते का असे विचारले असता गुलजार म्हणाले, ‘सिनेमांसाठी गीत नव्हे तर गाणी रचली जातात. सिनेमांसाठी गाणी लिहिणे कठीण असते. गाणी तयार करताना कथा, पटकथा, पात्राच्या भावना, त्याचा दृष्टकोन लक्षात घेऊन गाणे लिहावे लागते. मात्र, कवीला कविता लिहिताना पूर्ण स्वातंत्र्य असते.
‘चलो ना दरिया में काटा डाले, नझ्म पकडे‘ असे म्हणत मनातील भावना वेळच्या वेळी कागदावर उतरल्या नाहीत, त्यांनी रसिकांशी संवाद साधला नाही तर त्या कविता ‘अपूर्ण’ राहतात. कवितेला लोकप्रियतेचा कोणताही मापदंड नसतो, असा विचार त्यांनी मांडला.
सिनेमा आणि साहित्यातमध्ये काळाच्या ओघात झालेला बदल विचारला असता, त्यांनी या प्रश्नाला बगल देत भावना व्यक्त करण्यावर भर दिला. प्रत्येक नझ्मने या गप्पा उत्तरोत्तर रंगत गेल्या.
देशपातळीवर सर्व भाषांचे एक संमेलन हवे
- देशामध्ये विविध भाषा आहेत. मात्र, मराठीसारखे साहित्य संमेलन अन्य भाषांमध्ये होत नाही, असे गौरवोद्गार उद्घाटन समारंभात कवी गुलजार यांनी काढले. देशपातळीवर सर्व भाषांचे लेखक एकत्र येतील, असे संमेलन व्हावे, अशी आपली इच्छा आहे. मात्र, तसे संमेलन अद्याप साकारलेले नाही. बनारसला तसेच पाटण्यातही असा प्रयत्न झाला होता. मात्र, त्याला यश आले नाही. महाराष्ट्र यात पुढाकार घेऊ शकतो, असा विश्वास आपणाला वाटतो.
- विं. दा. करंदीकर, कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्य मी स्वत: उर्दूत नेले आहे. आजच्या समकालीन शायरांना
एकत्र कसे आणता येईल, याचाही विचार होणे आवश्यक आहे.
वाचनासाठी चोरली पुस्तके...
- वाचनाची गरज भागविण्यासाठी आपण लहानपणी अनेकदा वाचनालयातून तसेच, भावाची पुस्तके चोरली. पुस्तकांवर लेखक, कवींचे जे नाव असायचे, त्याबद्दल आपणाला विशेष क्रेझ होती, अशी आठवणही गुलजार यांनी सांगितली.