तीन दिवसांनी मिळाली पुस्तके
By admin | Published: April 28, 2016 02:02 AM2016-04-28T02:02:51+5:302016-04-28T02:02:51+5:30
एससीईआरटीतर्फे सहावीच्या अभ्यासक्रमाची बदललेली पुस्तके प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर तीन दिवसांनी शाळांच्या हातात मिळाली.
चिंचवड : एससीईआरटीतर्फे सहावीच्या अभ्यासक्रमाची बदललेली पुस्तके प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर तीन दिवसांनी शाळांच्या हातात मिळाली. शिक्षकांना मराठी माध्यमाचे प्रशिक्षण मिळाले. मात्र, उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या प्रशिक्षणाची प्रतीक्षा शिक्षकांना करावी लागत आहे.
सहावीच्या पुस्तकात काही कठीण पाठ्यक्रम आहेत. प्रत्यक्षदर्शनी प्रशिक्षण सुरू असताना पुस्तके शिक्षकांना वेळेत मिळायला हवी होती. शिक्षकांना सर्व विषय समजणे सोपे झाले असते. मात्र, शिक्षकांना पुस्तके वेळेत उपलब्ध झाली नाहीत.
सहावीचे उर्दू व इंग्रजी या माध्यमांचे प्रशिक्षण शिक्षकांना दिले गेले नाही. मराठी माध्यमाच्या प्रशिक्षणासोबतच हे प्रशिक्षण सुरू व्हायला हवे होते. मात्र, ते झाले नाही. मराठी माध्यमांच्या प्रत्येकी १०० पुस्तकांचा संच शाळांना देण्यात आला आहे. त्यामध्ये मराठी, समाजशास्त्र, गणित, विज्ञान, हिंदी या विषयांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड विभागांतर्गत एकूण ११५ शिक्षकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. दोन केंद्रावर हे प्रशिक्षण सुरू होते. आॅनलाइन प्रशिक्षणाचे सर्व मुद्दे सॉफ्टवेअरमध्ये नमूद केले होते. मात्र, संगणकावर प्रशिक्षण सुरू असताना सर्व बाबी शिक्षकांच्या लक्षात आल्या नाहीत. प्रशिक्षणानंतर तिसऱ्या दिवशी पुस्तके मिळाल्याने शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. (वार्ताहर)