Neelam Gorhe : पुस्तकांच्या दुकानांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करा, नीलम गोऱ्हेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 07:44 PM2021-06-01T19:44:56+5:302021-06-01T19:51:49+5:30
Neelam Gorhe : पुस्तकांच्या दुकानांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्याची विनंती विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन केली आहे.
पुणे : कोरोना संकट काळात एकटे राहणे, कुटुंबीयांवर कोरोनाचा आघात होणे, कोरोनामुक्त झाल्यावर घरातच थांबावे लागणे अशा परिस्थितीत लोकांचे मनोबल वाढविणे अतिशय गरजेचे आहे. हे मनोबल वाढविण्यासाठी साहित्य मोठी भूमिका बजावत असते आणि साहित्यातून माणसाला उमेदही मिळत असते. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर दुकानांचा अत्यावश्यक सेवेत समावेश केला आहे. त्याचप्रमाणे पुस्तकांच्या दुकानांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्याची विनंती विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री सुभाषजी देसाई, नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना पत्र देऊन केली आहे. (Bookstores should be included in essential services, Neelam Gorhe demanded)
गेले पंधरा महिने कोरोनामुळे समाजाची गती फार मोठ्या प्रमाणात मंदावलेली आहे. उद्योग क्षेत्राला जसा त्याचा फटका बसला असला तरीसुद्धा राज्य सरकारने उद्योग चालू ठेवण्यासाठी पराकाष्ठा केली आहे. कोरोना ग्रस्तांची संख्या आता कमी होण्याची चिन्हे अनेक जिल्ह्यांमध्ये दिसत आहेत आणि त्यामुळे चोवीस शहरात दुकानांच्या वेळा वाढविण्यात आल्या आहेत. त्यानुसार दुपारी दोनपर्यंत दुकानांना परवानगी दिलेली आहे. त्याचप्रमाणे पुस्तकांची जी दुकाने आहेत आणि विशेषतः वेगवेगळ्या प्रकारची मराठी साहित्यांची दुकाने आहेत, ती आणि अन्य भाषिक पुस्तकांची दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
कोरोनाग्रस्तांना #SBI मधून मिळेल 5 लाख रुपयांपर्यंत #PersonalLoan, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या...https://t.co/7wwB6ZjwBA
— Lokmat (@MiLOKMAT) June 1, 2021
याचबरोबर, ही परवानगी ताबडतोब अंमलात आणावी. तसेच, पुस्तकांच्या इतर दुकानांची वेळ आहे. त्यांच्याकडून जशा बाकीच्या वस्तू घरपोच दिल्या जाऊ शकतात. त्याचप्रमाणे ही पुस्तक सुद्धा घरपोच देण्याची व्यवस्था जे दुकानदार करतील त्यांना तशी परवानगी द्यावी. त्यासाठी त्वरित पुस्तकांच्या दुकानांबाबतचे निर्बंध आपण बदलून त्यांना अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करावे, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी सदर पत्रात केली आहे. तसेच, याचा उपयोग निश्चितपणाने प्रकाशन क्षेत्र, साहित्य क्षेत्रांवर अत्यंत चांगल्या प्रकारचा झालेला दिसेल. या दृष्टीकोनातून विशेष लक्ष द्यावे, अशी विनंती देखील नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.