बोपखेल पुलास ग्रीन सिग्नल

By admin | Published: May 17, 2016 03:04 AM2016-05-17T03:04:48+5:302016-05-17T03:04:48+5:30

बोपखेल-खडकी पुलास अखेर कोलकताच्या आॅल इंडिया आॅर्डनन्स फॅक्टरी बोर्डाने ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिले आहे.

Bopkhel Pullas Green Signal | बोपखेल पुलास ग्रीन सिग्नल

बोपखेल पुलास ग्रीन सिग्नल

Next


पिंपरी : बोपखेल रहिवाशांना वाहतुकीसाठी मुळा नदीवरील बोपखेल-खडकी पुलास अखेर कोलकताच्या आॅल इंडिया आॅर्डनन्स फॅक्टरी बोर्डाने ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिले आहे. तब्बल दोन वर्षांनंतर या प्रश्नावर तोडगा निघाला आहे. पूल उभारणीतील संरक्षण विभागाचा एनओसीचा मुख्य अडसर दूर झाल्याने आता लवकरच वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत कॉलेज आॅफ मिलिटरी इंजिनिअरिंगने (सीएमई) आपल्या हद्दीतील नागरी रस्ता बोपखेल रहिवाशांना ये-जा करण्यासाठी १३ मे २०१४ ला बंद केला. तो पूर्ववत खुला करण्यासाठी आंदोलन आणि दगडफेकीचा प्रकार झाला होता. यामुळे हा प्रश्न चांगलाच पेटला होता. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मध्यस्थी करीत खडकीच्या बाजूने पूल उभारण्यास परवानगी देण्याचे आदेश खडकीच्या अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी व्यवस्थापनास दिले होते. या संदर्भात त्यांच्यासोबत ६ ते ७ बैठका झाल्या. तोपर्यंत सीएमईने तात्पुरता तरंगता पूल उभारला आहे. बोपखेल स्मशानभूमी ते खडकीच्या बाजूच्या ५१२ आर्मी बेस वर्कशॉपच्या मागील बाजूने रस्ता तयार करण्यात आला आहे. सध्या येथून वाहतूक सुरू आहे.
याच मार्गावर पक्का पूल महापालिकेतर्फे उभारण्यात येणार आहे. त्याच्या १४.५ कोटी खर्चास आणि रस्त्यांसाठी ५.२५ कोटी रुपये खर्चास महापालिकेने मंजुरी दिली आहे. मात्र, संरक्षणदृष्ट्या हा भाग अतिसंवेदनशील असून, येथून पूल आणि रस्ता बांधण्यास फॅक्टरी व्यवस्थापनाने वेळोवेळी स्पष्ट नकार दिला होता. संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी या संदर्भात बैठका घेऊनही फॅक्टरी व्यवस्थापन सुरक्षेचा प्रश्न पुढे करीत होते. खडकी येथे आयोजित भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी संरक्षणमंत्री पर्रीकर गेल्या महिन्यात २१ तारखेला आहे होते. त्याचदिवशी त्यांनी साप्रस, खडकी येथील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (बीईजी) येथे बैठक घेऊन, फॅक्टरी व्यवस्थापनांस एनओसी देण्याचे सक्त आदेश दिले होते. त्यानंतर तातडीने कार्यवाही होऊन फॅक्टरी व्यवस्थापनाने कोलकत्ताच्या आॅल इंडिया आॅर्डनन्स फॅक्टरी बोर्डाकडे एनओसीबाबत पाठपुरावा केला. त्यास मान्यता मिळताच ११ मे रोजी एनओसीचे पत्र फॅक्टरीचे सहसरव्यस्थापक एन. पी. नाईक यांनी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना पाठविले. (प्रतिनिधी)
।असा आहे मार्ग : लांबी ८५0 मीटरपर्यंत
५१२ आर्मी बेस वर्कशॉपच्या बाजूने पूल काढून तो फॅक्टरीच्या रस्त्यास जोडण्यात येणार आहे. टॅक रोडने तो पंडित जवाहरलाल नेहरू (त्रिकोणी) उद्यान येथे निघेल. तेथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याने खडकी बाजार, बोपोडीहून दापोडीत येता येणार आहे. पूल आणि रस्त्यात बदल सुचविले असल्याने
पुलाची लांबी वाढून ती ८५० मीटरपर्यंत करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे खर्च वाढणार आहे. टॅक रोडच्या दोन्ही बाजूंनी ३.४५ मीटरचा रस्ता तयार केला
जाणार आहे. संरक्षण विभागाच्या अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीची एनओसी मिळाल्याने आता केंद्र आणि राज्य सरकारची परवानगीची गरज राहिलेली नाही. नव्या कामाचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर होताच निविदा काढून पुढील प्रक्रिया सुरू होईल.

Web Title: Bopkhel Pullas Green Signal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.