दारूबंदीसाठी बॉर्डर परिषद
By Admin | Published: October 2, 2014 10:16 PM2014-10-02T22:16:48+5:302014-10-02T22:25:27+5:30
महाराष्ट्र, गोव्याचा सहभाग : अवैधरित्या होणारी दारूवाहतूक रोखण्याकडे कल
सावंतवाडी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात असून, राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच निवडणूक काळात अवैधरित्या होणारी दारू वाहतूक पूर्णत: बंद व्हावी, यासाठी महाराष्ट्र व गोव्याची बॉर्डर परिषद बुधवारी पणजी येथील गोवा पोलीस मुख्यालयात पार पडली.
यावेळी गोव्याचे पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग, उत्तर गोव्याच्या पोलीस अधीक्षक प्रियांका काश्यप, दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप यांच्यासह कोकणचे पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी ई. रवींद्रन, पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर, उत्पादन शुल्कचे अधीक्षक दिलीप मोरे आदी यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोव्याचा मोठा प्रभाव असून, निवडणूक काळात कोणतीही घटना घडल्यानंतर हे आरोपी प्रथम गोव्याचा आसरा घेतात. रेल्वे तसेच अन्य साधनांचा वापर बहुतेकवेळा करतात. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू येण्याची शक्यता असून त्यावर कोठेतरी निर्बंध यावेत. म्हणून बरीच वर्षे बंद असलेली बॉर्डर परिषद गोवा व महाराष्ट्राने सुरू केली.
ही बॉर्डर परिषद बुधवारी पणजी येथील गोव्याच्या पोलीस मुख्यालयात पार पडली. सिंधुदुर्ग व गोव्याच्या अंतर्गत सुरक्षिततेबाबत चर्चा करण्यासाठी ही परिषद भरविण्यात येते. यावेळी गोव्याच्या पोलीस अधिकाऱ्यांसमोर महाराष्ट्र पोलिसांनी आपली बाजू मांडली.
यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका असून या काळात मोठ्या प्रमाणात गोव्याची अवैध दारू सिंधुदुर्गमध्ये येऊ शकते त्यावर निर्बंध घालण्याची विनंती केली. तसेच निवडणूक काळात एखादा आरोपी हा सिंधुदुर्गमधून गोव्यात आल्यास त्याला तातडीने पकडण्यासाठी पोलीस यंत्रणेने सहकार्य करावे, असे ठरवण्यात आले.
सिंधुदुर्ग सीमारेषेवरील पेडणे, हरमल या पोलीस ठाण्यांनी विशेष सुरक्षा पुरवावी, गाड्यांची तपासणी मोहीम जास्तीत जास्त प्रमाणात हाती घ्यावी, असे या बैठकीत मुद्दे मांडण्यात
आले.
यावर गोवा पोलिसांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून, गोव्यालाही पुढील काळात सिंधुदुर्गचे सहकार्य आवश्यक आहे. प्रत्येक गाडी तपासल्यानंतरच सिंधुदुर्गात सोडण्यात येईल, त्यामुळे दारू वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर आळा बसेल, असे सांगितले. तसेच आवश्यकता वाटल्यास पत्रादेवी पोलीस दूरक्षेत्रात अलर्ट करण्यात येईल, असे आश्वासन गोवा पोलिसांनी दिले आहे. या परिषदेची अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही. मात्र, उपस्थित अधिकाऱ्यांनी यातील काही मुद्द्यांची सविस्तर माहिती दिली. (प्रतिनिधी)
महाराष्ट्र, गोव्याचे पोलीस अधिकारी उपस्थित.
बॉर्डर परिषदेतून कर्नाटकला फाटा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोव्याचा मोठा प्रभाव.
निवडणूक काळात गोव्यातून अवैध दारू येण्याची शक्यता.
आंबोली येथे पाच वर्षांपूर्वी बॉर्डर परिषद पार पडली होती. यावेळी कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आदी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. मात्र, यावेळी गोवा व महाराष्ट्र या दोन राज्यांत ही बॉर्डर परिषद झाली असून, कर्नाटक राज्याला या परिषदेतून फाटा देण्यात आला.