‘थेट सरपंच निवडीने विकासाला खीळ’
By admin | Published: July 15, 2017 05:02 AM2017-07-15T05:02:56+5:302017-07-15T05:02:56+5:30
ट लोकांमधून सरपंच निवडण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय विकासाच्या मुळावर येणारा आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे /नंदुरबार : थेट लोकांमधून सरपंच निवडण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय विकासाच्या मुळावर येणारा आहे. सरपंच एका पक्षाचा व सर्व सदस्य दुसऱ्याच पक्षाचे निवडून आले तर गावांचा विकास कसा साधला जाणार? यामुळे ग्रामविकासाला निश्चितपणे खीळ बसेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे केले.
नंदुरबार व धुळे येथे शुक्रवारी आयोजित पक्षकार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या प्रसंगी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी महिला कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, युवती अध्यक्ष स्मिता पाटील आदी उपस्थित होते.
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना थेट नगराध्यक्ष निवडीचे दुष्परिणाम स्पष्ट झाल्याने आम्ही सदस्यच सरपंच, नगराध्यक्ष व महापौर यांची निवड करतील, अशी व्यवस्था केली होती. तीच या सरकारने मोडीत काढल्याचे पवार म्हणाले.
या सरकारची मुदत संपत आली तरी अद्याप प्रश्नांचा अभ्यासच करत आहेत. मग ते हे प्रश्न सोडविणार कधी? कर्जमाफीच्या निर्णयाचा विचका झाला आहे. एकदा निर्णय घेतल्यानंतरही जीआर बदलत आहेत.