सीमा प्रश्न कौरव-पांडवांचे युद्ध नाही : संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 05:28 AM2020-01-19T05:28:00+5:302020-01-19T05:28:32+5:30
महाराष्ट्र एकीकरण समितीने आपल्यातील गट-तट संपविले पाहिजेत. गट-तट जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत हा लढा तीव्र होणार नाही.
बेळगाव - सीमा प्रश्न म्हणजे कौरव-पांडवांचे युद्ध नाही, दोन्ही बाजूला पांडवच आहेत. देशामध्ये भाषा-भाषांमध्ये वाद असू नयेत. या ठिकाणी भाषेचा आणि संस्कृतीचा वाद आहे; मात्र या प्रश्नी न्यायालयच निर्णय देईल, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केले.
बेळगावातील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित बॅ नाथ पै व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी राऊत यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. हा कार्यक्रम गोगटे रंगमंदिरमध्ये झाला. संजय राऊत म्हणाले, सध्या सीमाप्रश्नाचा लढा न्यायालयात आहे. हा लढा उत्तम प्रकारे लढायला पाहिजे. टोकाचा संघर्ष न करता मराठी भाषा, संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोणतीही भाषा, संस्कृती टिकविणे ही प्रत्येक राज्याची जबाबदारी आहे. भाषेला शत्रू न मानता त्याचा विकास करण्याचा प्र्रयत्न केला पाहिजे. देशामध्ये भाषा-भाषांमध्ये वाद असू नयेत. या ठिकाणी भाषेचा आणि संस्कृतीचा वाद आहे; मात्र या प्रश्नी न्यायालयच निर्णय देईल.
महाराष्ट्र एकीकरण समितीने आपल्यातील गट-तट संपविले पाहिजेत. गट-तट जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत हा लढा तीव्र होणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही अशीच भूमिका आहे, असेही राऊत म्हणाले. सरकार चालविण्यासाठी धर्माचा आधार घेऊ नये. धर्माचा आधार घेतला तर हिंदुस्थानचा पाकिस्तान, इराण व्हायला वेळ लागणार नाही. आमचं हिंदुत्व गाडगे महाराजांचे आहे. तहानलेल्याला पाणी, भुकेलेल्याला अन्न आणि हवा असलेल्याला निवारा अशी गाडगे महाराजांची जी भूमिका होती तीच आम्ही पुढे घेऊन चाललोय.
कडेकोट बंदोबस्त;
राऊत यांचे उत्स्फूर्त स्वागत
संजय राऊत यांच्या मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात व कार्यक्रमस्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी मराठीतच बोलतो
संजय राऊत म्हणाले, भाषा वाद जरी झाला असला तरी भाषेचा वाद असू नये. कारण आपला देश एकच आहे. कानडी बांधव महाराष्ट्रात जिथ- जिथे राहतात तिथे कानडी शाळांना अनुदान देण्याचे काम आमचे सरकार (महाविकास आघाडीचे) करीत आहे. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी आजही आम्ही शुद्ध मराठीतच बोलतो.