बोरवडेत राजकीय वादातून धुमश्चक्री
By Admin | Published: October 22, 2014 05:55 AM2014-10-22T05:55:55+5:302014-10-22T05:55:55+5:30
राजकीय पूर्ववैमनस्यातून कागल तालुक्यातील बोरवडे येथे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास माजी मंत्री हसन मुश्रीफ व मंडलिक-घाटगे गटांत तुंबळ हाणामारी झाली.
कोल्हापूर : राजकीय पूर्ववैमनस्यातून कागल तालुक्यातील बोरवडे येथे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास माजी मंत्री हसन मुश्रीफ व मंडलिक-घाटगे गटांत तुंबळ हाणामारी झाली. यावेळी मुश्रीफ गटाकडून मंडलिक-घाटगे गटांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. हाणामारीत तलवारी, लोखंडी गज, कुऱ्हाडींचा सर्रास वापर करण्यात आला. यामध्ये दोन्ही गटांचे दहाजण गंभीर जखमी झाले असून, गावात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणी पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत़
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुश्रीफ यांचे कार्यकर्ते व बिद्री कारखान्याचे संचालक गणपती गुंडू फराकटे यांचा मुलगा मनोज याने किरकोळ कारणावरुन मंडलिक-घाटगे गटाच्या संदीप कुंभार याला बेदम मारहाण केली होती. यावेळी संदीपने आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांना ही माहिती दिल्याने दोन्ही गटांमध्ये मोठी वादावादी झाली. हे प्रकरण मुरगूड पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते. दरम्यान, मंगळवारी पुन्हा सकाळी मुश्रीफ गटाचे गणपती फराकटे व मंडलिक-घाटगे गटाचे संभाजी फराकटे यांच्यात वादावादी होऊन तुंबळ हाणामारी झाली. अचानक उडालेल्या धुमश्चक्रीमुळे गोंधळ उडाला. यावेळी तलवार, लोखंडी गज, कुऱ्हाडींचा वापर करण्यात आल्याने दोन्ही गटांचे दहाजण गंभीर जखमी झाले. निवडणुकीच्या वादातून मारामारी झाल्याचे समजताच दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. (प्रतिनिधी)